आगामी निवडणुकांत भाजपच्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या !
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
कणकवली – आगामी काळात जिल्ह्यातील सहकार क्षेत्र, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद येथे आपली सत्ता कायम राहिली पाहिजे. यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळात जाऊन निवडणुकांची सिद्धता करावी. केंद्रशासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकजुटीने काम करून विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन केंद्रीय लघु आणि सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.
ओसरगाव येथील ‘महिला भवन’ येथे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, प्रदेश सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘देशात आणि महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक बांधणी आदर्शवत् राहिली पाहिजे. निवडणुकीत उमेदवार कुणीही असला, तरी पक्षासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. त्या वेळी अंतर्गत गटबाजी न करता एकजुटीने विरोधकांचा पराभव करण्यासाठी काम करा.’’