दळणवळण बंदीच्या कालावधीत महालय श्राद्ध करतांना आलेल्या अनुभूती
१. ‘सनातन चैतन्यवाणी’ या ‘ॲप’मधून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप सतत चालू ठेवल्याने घरात सात्त्विक आणि सकारात्मक वातावरण निर्माण होणे
‘कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदीच्या कालावधीतील पितृपक्षात आम्ही प्रतिदिन एक घंटा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होतो. १६.१०.२०२० या दिवशी आमच्या घरी महालय श्राद्ध होते. आम्ही श्राद्धाच्या दिवशी सकाळी १ घंटा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला. त्यानंतर ‘सनातन चैतन्यवाणी’ या ‘ॲप’मधून घेतलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप घरात सतत चालू होता. त्या दिवशी सकाळपासूनच माझ्याकडून पूर्वजांना सद्गती प्राप्त होण्यासाठी दत्तगुरूंना प्रार्थना होत होती. घरात सात्त्विक आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. माझी पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त होत होती. त्यामुळे मी सकाळपासून एक वेगळाच आनंद अनुभवत होतो.
२. दळणवळण बंदीच्या कालावधीत महालय श्राद्ध भावपूर्ण झाल्याने दिवंगत आई-वडील आणि पूर्वज आनंदी झाल्याचे जाणवणे अन् गुरूंच्या कृपेने वेगळाच आत्मिक आनंद दीर्घकाळ अनुभवता येणे
दळणवळण बंदी असूनही देवाच्या कृपेने आम्हाला श्राद्धाच्या २ दिवस आधी सर्व भाज्या मिळाल्या होत्या. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘दळणवळण बंदीच्या कालावधीत घरी श्राद्धविधी कशा प्रकारे करू शकतो ?’, हा लेख प्रसिद्ध झाला होता. आम्हाला त्याचाही लाभ झाला. सनातननिर्मित ‘श्राद्ध’ या ‘ॲप’द्वारे प्रसारित केलेली माहिती वाचून मी आमच्या कुटुंबामध्ये अकस्मात् मृत्यू पावलेल्या सर्वांची आणि पूर्वजांची पिढीप्रमाणे नावांची सूची सिद्ध केली अन् तिळाचे तर्पण केले. नंतर मी आगाशीत जाऊन कावळ्याला पान (श्राद्धाचे अन्न असलेले पान) ठेवले. त्या वेळी आम्ही बाजूला उभे राहून पूर्वजांना भावपूर्ण प्रार्थना करत होतो. तेव्हा प्रार्थना पूर्ण होण्याच्या आधीच कावळ्याने अन्न ग्रहण केले. तेव्हा मला दिवंगत आई-वडील आणि पूर्वज तृप्त होऊन आनंदी झाल्याचे जाणवले.
आमच्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली आणि श्री गुरूंच्या कृपेने वेगळाच आत्मिक आनंद दीर्घकाळपर्यंत अनुभवता आला. आतापर्यंत श्राद्धाचा विधी करतांना मी मनाची एवढी सकारात्मक स्थिती आणि आनंद अनुभवला नव्हता. मला या आपत्काळात कोरोनाच्या कालावधीत श्री गुरूंच्या कृपेने आनंद अनुभवता आला.
‘परात्पर गुरु डॉक्टर, या घोर आपत्काळात तुम्हीच आमच्याकडून हे श्राद्धाचे विधी भावपूर्ण करवून घेऊन एक वेगळाच आत्मिक आनंद अनुभवायला दिला. त्यासाठी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. दिलीप नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |