सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मान्यता
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (‘नॅशनल मेडिकल कमिशन’ने) अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे या महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झाला आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी प्रारंभापासूनच सकारात्मक भूमिका होती. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाविषयी जिल्हावासियांना दिलेला शब्द पुरा केला आहे. आतापर्यंत जे मंत्री, मुख्यमंत्री जिल्ह्यात झाले, त्यांनी स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय चालू केले; मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. ते आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामुळे झाले, असे या वेळी सांगण्यात आले.
महाविद्यालयासाठी ९६६ कोटी रुपयांची तरतूद
या वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्यशासनाने ९६६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. १०० विद्यार्थी क्षमतेच्या या महाविद्यालयाशी संलग्न ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची २० एकर भूमी वैद्यकीय शिक्षण विभागास देण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. (M.B.B.S) अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याकरता यावर्षी मान्यता दिली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.