वेश्याव्यवसायातील बहुतांश मुली आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वेश्याव्यवसायाकडे वळल्या ! – ‘अर्ज’ या संस्थेचा दावा
३७ टक्के महिलांना बळजोरीने या व्यवसायात ढकलल्याचे स्पष्ट
- मनुष्यजन्माचे कारण, त्याचे ध्येय आदी कशाचीही शिकवण न दिल्यामुळे समाजातील महिला स्वतःहून अशा गैरमार्गाकडे वळतात. – संपादक
- मुलींना बळजोरीने वेश्याव्यवसायात ढकलेल्या किती जणांवर कारवाई झाली ?- संपादक
पणजी, २० सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या बहुतांश महिला किंवा मुली यांची माहिती घेतली असता, त्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने या व्यवसायाकडे वळल्याचे आढळले, तर ३७ टक्के पीडित महिलांना बळजोरीने या व्यवसायात ढकलले गेले आहे, असे ‘अर्ज’ (अन्याय रहित जिंदगी) या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
या व्यवसायाकडे वळणार्या मुलींपैकी ६२ टक्के मुलींनी शिक्षण अल्प प्रमाणात घेतल्याचे निदर्शनास आले आहे. अर्ज या संस्थेने वर्ष २०१४ पासून केलेल्या अभ्यासानुसार हा अहवाल सिद्ध केला आहे. या अहवालानुसार वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या मुलींपैकी ६६ टक्के मुली शहरी भागांतून, तर ३४ टक्के मुली ग्रामीण भागांतून आलेल्या होत्या. या व्यवसायात ६४ टक्के मुली प्रत्यक्ष ग्राहक शोधतात, तर ३६ टक्के मुली ‘ऑनलाईन’ पद्धतीने ग्राहक शोधत असल्याचे आढळले. हा व्यवसाय अधिकतः हॉटेल्स आणि लॉजिंग या ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या व्यतिरिक्त काही मसाज पार्लर, सदनिका आणि बंगले यांठिकाणीही हा व्यवसाय चालतो. हा व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त करणार्यांच्या माहितीचा विचार करता अधिक करून मित्रांकडून या व्यवसायात मुलींना ढकलले जाते. मित्रांच्या माध्यमातून ३४.५ टक्के, ओळखीच्या व्यक्तींकडून २२.१ टक्के, अनोळखी व्यक्तींकडून २३.३ टक्के आणि जवळच्या व्यक्तींकडून १०.९ टक्के मुली या व्यवसायात ढकलल्या गेल्या आहेत. वयाचा विचार करता २५ ते ३५ वर्षे वयोगटातील मुली सर्वाधिक; म्हणजे ४३ टक्के आहेत. त्यानंतर २१ ते २५ वर्षे वयोगटातील ३५ टक्के, १८ ते २१ वर्षे वयोगटातील १३ टक्के आणि ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील ६ टक्के महिला या व्यवसायात असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.