कर्तव्यदक्ष, अभ्यासू, तात्काळ निर्णय घेणारे आणि सामान्यांना आधार वाटणारे कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी राहुल रेखावार !
श्री. अजय केळकर, कोल्हापूर
कोल्हापूर – कोल्हापूरची ओळख ही नेहमीच आगळीवेगळी असते. श्री महालक्ष्मी देवीचा कृपाशीर्वाद लाभलेल्या या भूमीत अनेक चांगल्या अधिकार्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे. कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याप्रमाणेच १५ जुलैपासून कोल्हापूर जिल्ह्याचे कामकाज पहाणारे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही अल्पावधीतच त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे. राहुल रेखावार यांच्या कामाची शैलीच अशी आहे की, तात्काळ निर्णय घेत ते विविध प्रकरणांमध्ये सामान्यांना लगेच न्याय मिळवून देतात !
कर्तव्यदक्ष राहून योग्य अहवाल सिद्ध केल्याने हिंगोली येथे राजकीय पदाधिकार्यांनी अविश्वास ठराव आणणे !
वर्ष २०१२ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत भरती झालेल्या राहुल रेखावार यांना फेब्रुवारी २०१५ मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा स्वतंत्र पदावर काम करण्याची संधी लाभली. याच काळात पंचायत राज समितीचा हिंगोली दौरा निश्चित झाला. केवळ १५ दिवसांत राहुल रेखावार यांनी अतिशय योग्य अहवाल सिद्ध केला. या अहवालातून अनेक अनियमितता बाहेर आल्याने तेथील राजकीय पदाधिकार्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो संमत केला. त्यामुळे तेथे त्यांना केवळ ६ मासच काम करता आले.
यानंतर त्यांनी परभणी, धुळे, महावितरण, बीड येथे काम केले. कोल्हापूर येथे येण्यापूर्वी ते अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
सर्वसामान्यांसाठी त्यांचे दालन खुले करणे !
जिल्हाधिकार्यांनी सर्वसामान्यांसाठी त्यांचे दालन खुले केले असून त्यांच्या दालनाची दोन्ही दारे सामान्यांना प्रवेशासाठी उघडी ठेवली आहेत. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २, तसेच शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ते कुणचीही गार्हाणी ऐकून घेतात. कोणताही सामान्य माणूस कोणतेही प्रकरण घेऊन आल्यावर त्यांच्याशी प्रेमाने बोलणे आणि तात्काळ विषय हातावेगळा करणे, यात त्यांची हातोटी आहे. जिल्हाधिकारी लोकांशी नम्रतेने बोलतात, समोरच्याचे बोलणे पूर्णत: ऐकून घेतात त्यामुळे सामान्यांना त्यांचा आधार वाटतो. अनेक प्रकरणांमध्ये आणखी काय करायला हवे ? हेही प्रेमाने ते सामान्यांना समजावून सांगतात.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अनियमिततेविषयी तात्काळ बैठक घेणे !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अनियमिततेविषयी श्री अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी निवेदन दिल्यावर जिल्हाधिकारी यांनी दोनच दिवसांत बैठकीचे आयोजन केले. श्री. प्रमोद सावंत यांना सायंकाळी ७ वाजता बैठकीची वेळ दिली होती. यानंतर काही अन्य प्रशासकीय कामांमुळे त्यांना ही बैठक चालू करण्यास रात्रीचे ९ वाजले. खरेतर जिल्हाधिकारी ‘आता वेळ झाला आहे’, असे म्हणून दुसर्या दिवशीही बैठक घेऊ शकले असते; मात्र त्यांनी रात्री ११.४५ पर्यंत ही बैठक घेऊन यातील अनेक सूत्रे निकाली लावली. सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी प्रशासकीय कामकाजाची वेळ असतांना रात्री १२ पर्यंत काम करणारे असे अधिकारी सध्या प्रशासकीय सेवेत अल्पच आहेत.
विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या बैठकीत तत्परतेने अनेक निर्णय घेऊन पुरातत्व खात्याला त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देणारे राहुल रेखावार !
विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी यांनी या विषयाची पूर्ण माहिती घेतली. समितीने मांडलेली अनेक सूत्रे योग्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुरातत्व खात्याचे अधिकारी विशाळगड त्यांच्या कह्यात येत नसल्याचे सांगून दायित्व झटकण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी तहसीलदार शाहूवाडी यांच्या पत्राचा संदर्भ देऊन जिल्हाधिकारी यांनी विशाळगड हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारितच येतो, याची जाणीव करून दिली. पूर्वी पुरातत्व खात्याने अतिक्रमण धारकांना केवळ १५ दिवसांच्या मुदतीच्या दिलेल्या नोटिसा कायदेशीरदृष्ट्या कशा टिकणार्या नाहीत ? हे सांगून ३० दिवसांच्या परत नोटिसा देण्यास त्यांना सांगितले. यातून त्यांचा कायद्याचा अभ्यासही सूक्ष्म असल्याचे लक्षात आले.