श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील तत्कालीन मंदिर व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना १ वर्षानंतर अटक !
श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील अलंकार आणि प्राचीन नाणी गहाळ झाल्याचे प्रकरण
१७ वर्षे मंदिर व्यवस्थापक असतांना केला होता अपहार !
- मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! – संपादक
- मंदिरे अन् त्या माध्यमातून हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी आता मंदिरे भक्तांकडे सोपवण्यात यावीत, असेच हिंदु धर्मप्रेमींना वाटते. – संपादक
धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील जमादार खान्यातील देवीच्या खजिन्यात ठेवलेले देवीचे अतीप्राचीन अलंकार, वस्तू, तसेच दुर्मिळ ७१ नाणी गहाळ केल्याच्या प्रकरणी तत्कालीन मंदिर व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना तुळजापूर पोलिसांनी अंततः अटक केली आहे. या प्रकरणी नाईकवाडी यांच्यावर १ वर्षापूर्वी गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून ते पसार होते. (महत्त्वाच्या अपराधामध्ये सहभागी असलेल्या आरोपीला अटक करण्यास १ वर्षाचा कालावधी का लागतो ? यावरून पोलीस आणि प्रशासन यांची मंदिरांसंदर्भात असलेली उदासीनता लक्षात येते ! – संपादक)
काय आहे प्रकरण ?
१. श्री तुळजाभवानीदेवीला निजाम, औरंगजेब, पोर्तुगीज यांच्यासह बिकानेर, उदयपूर, लखनौ, बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे-महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवीच्या चरणी अर्पण केली होती. तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या अहवालात या पुरातन ७१ नाण्यांची नोंद वर्ष १९८० पर्यंत होती; मात्र वर्ष २००५ आणि वर्ष २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यांत या नाण्यांसह प्राचीन सोन्या-चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर कल्याणराव गंगणे यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या ‘साठा नोंद दप्तरा’ची मागणी केली होती. त्यातून ७१ पुरातन नाणी गहाळ झाल्याचे उघड झाले होते.
२. श्री. किशोर गंगणे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे ९ मे २०१९ या दिवशी श्री भवानीदेवीच्या खजिन्यातील वस्तू गहाळ झाल्याविषयी लेखी तक्रार केली होती. त्यावर जिल्हाधिकार्यांनी तात्काळ चौकशी समिती नेमली.
३. दिलीप नाईकवाडी हे २९ नोव्हेंबर २००१ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापकपदी कार्यरत असतांना त्यांनी पदाचा दुरुपयोग केला. त्यांनी संस्थान आणि भाविक यांची फसवणूक केली असून मंदिराच्या खजिन्यातील देवीचे अलंकार अन् प्राचीन नाणी यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार केला, अशी माहिती चौकशीतून समोर आली होती. (असे भ्रष्ट अधिकारी तब्बल १७ वर्षे मंदिराचे व्यवस्थापन पहातात, हे धक्कादायक आहे. यातून मंदिर सरकारीकरणाचे संतापजनक दुष्परिणाम लक्षात येतात ! या कालावधीत अशा अधिकार्यांनी आणखी काय घोटाळे केले आहेत ? त्याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. हे सर्व हिंदूंच्या समोर यायला हवे ! – संपादक)
४. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सध्याचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिल्यानंतर, तसेच १३ सप्टेंबर २०२० या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी अन् तहसीलदार योगिता कोल्हे यांनी तक्रार दिल्यानंतर तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक नाईकवाडी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता.
सर्व आरोपींची चौकशी होऊन त्यांनाही योग्य शिक्षा होणे अपेक्षित ! – अधिवक्ता शिरीष कुलकर्णी
श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील जमादार खान्यातील अपहारप्रकरणी दिलीप नाईकवाडीला अटक झाली, हे योग्यच आहे; मात्र या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींची कसून चौकशी होऊन त्यांनाही योग्य ती शिक्षा होणे अपेक्षित आहे.