प्रयागराज येथे अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
-
महंत नरेंद्र गिरि यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा
-
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात शिष्याचे नाव
उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून सत्य हिंदूंसमोर आणावे ! – संपादक
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. येथील बाघंबरी मठामध्ये त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळल्याचे पोलिसांनी सांगितलेे. ‘महंतांनी आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेले ५ पानांचे पत्र सापडले आहे’, असा दावा पोलिसांनी केला आहे. यात त्यांनी त्यांच्या शिष्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. ‘माझा शिष्य माझी अपकीर्ती करत होता’, असे यात म्हटल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. तथापि ‘अधिक चौकशीनंतर याविषयीची माहिती समोर येईल’, असे पोलिसांनी म्हटले आहे. महंत नरेंद्र गिरि यांचा आनंद गिरि यांच्याशी संपत्तीचा वाद होता; मात्र नंतर तो मध्यस्थांद्वारे सोडवण्यात आला होता. महंत नरेंद्र गिरि यांच्या निधनाविषयी संत, महंत आदींकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.