७०० तात्पुरते आरोग्य कर्मचारी कमी करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय !
नवी मुंबई – ६०० ते ७०० आरोग्य सेवकांची सेवा थांबवण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात १ सहस्र ९११ जणांची भरती केली होती. त्यातील ६०० ते ७०० जणांची सेवा खंडित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता असतांना मनुष्यबळ न्यून करीत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
रुग्णसंख्या न्यून झाली तरी करार तत्त्वावर घेतलेल्या आरोग्य सेवकांची सेवा खंडित न करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त बांगर यांनी यापूर्वी दिले होते. तिसर्या लाटेसाठी आवश्यक मनुष्यबळ आपल्याकडे असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. कोरोनाच्या काळात नवी मुंबई पालिकेची १४ काळजी केंद्रे, तसेच पालिकेची वाशी, नेरूळ, ऐरोली, बेलापूर, तुर्भे येथील रुग्णालये इत्यादी ठिकाणी रुग्णसेवा दिली जात आहे.