थकीत वीजदेयकामुळे कराड नगरपालिकेची वीजजोडणी तोडण्यात आली !

कराड, १९ सप्टेंबर (वार्ता.) – १ लाख ४७ सहस्र रुपयांचे वीजदेयक थकवल्यामुळे कराड नगरपालिकेची वीजजोडणी तोडण्यात आली आहे, अशी माहिती वीज आस्थापनाचे साहाय्यक अभियंता बाबासाहेब पवार यांनी दिली. १६ सप्टेंबर या दिवशी कराड नगरपालिकेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यानंतर कराड नगरपालिकेवर वीजजोडणी तोडण्याची नामुष्की ओढावल्यामुळे पालिकेच्या कारभारावर टीका होत आहे.

बाबासाहेब पवार पुढे म्हणाले, ‘‘कराड नगरपालिकेच्या ‘ड्रेनेज’ विभागाच्या ‘पंपिंग स्टेशन’चे ७ लाख ९१ सहस्र रुपयांचे वीजदेयक थकीत असल्याने कार्यालयासहित ‘पंपिंग स्टेशन’ क्रमांक ३ चीही वीजजोडणी तोडण्यात आली आहे. पालिकेच्या इतरही विभागांच्या थकीत वीजदेयकांची माहिती घेऊन वीजजोडणी तोडण्यात येणार आहे. गत १ मासापासून आम्ही कराड नगरपालिकेला वीजदेयक देण्याविषयी पत्रव्यवहार करत होतो; मात्र पालिकेकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.’’

‘कराड नगरपालिकेच्या कार्यालयासह ‘पंपिंग स्टेशन’चे वीजदेयक थकीत आहे; मात्र ते फार जुने थकीत देयक नसून मागील मासापासूनचे थकीत देयक आहे. तरीही वीज आस्थापनाने वीज जोडण्याची कार्यवाही केल्यामुळे आश्चर्य वाटते. वीजदेयक भरण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरात लवकर ती पूर्णही होईल’, अशी प्रतिक्रिया कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.