राज्यातील ५ महापालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीच्या ‘ऑनलाईन’ प्रवेशाच्या ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त !
मुंबई – राज्यातील ५ महापालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वी प्रवेशासाठी राबवलेल्या ‘ऑनलाईन’ प्रक्रियेला यंदा विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईसह नागपूर, पुणे, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीच्या ५० टक्क्यांहून अधिक जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत. ३ सर्वसाधारण गुणवत्ता सूचीनंतर केवळ ५५.७४ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. ५ महापालिका क्षेत्रांतील एकूण १ सहस्र ४९४ महाविद्यालयांत उपलब्ध असलेल्या ५ लाख ३३ सहस्र ६७० जागांसाठी केवळ ३ लाख ८५ सहस्र ३९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी केवळ २ लाख १४ सहस्र ८०६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. ३ लाख १८ सहस्र ८६४ जागा (५९.७५ टक्के) अद्याप रिक्त आहेत.
मुंबई विभागात इयत्ता ११ वीच्या ३ लाख २० सहस्र ५०० जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी एकूण २ लाख ४१ सहस्र ८९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी १ लाख ३० सहस्र ६५१ विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत, तर अद्याप १ लाख ८९ सहस्र ८४९ जागा (५९.२४ टक्के) रिक्त आहेत. प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता सूचीत प्रवेशाची संधी मिळणार आहे. अर्ज करण्याची मुदत २० सप्टेंबरपर्यंत आहे.