राज्यातील लसीकरण मोहिमेमध्ये सातारा जिल्हा पुढे !
सातारा, १९ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यभरात लसीकरण मोहिमेमध्ये सातारा जिल्हा अग्रेसर ठरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोविशिल्डचे १ लाख ७० सहस्र, तर कोव्हॅक्सिनचे १२ सहस्र ४८० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे लसीकरण सत्रांची संख्याही ३५० हून अधिक करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात लसीकरणासाठी १ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी अत्यल्प प्रमाणात लस उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहीम मंदावलेली होती; मात्र नंतर लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यामुळे लसीकरणाने वेग घेतला. आता शहरी भागासह ग्रामीण भागातही लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, वाई आणि कोरेगाव या ५ शहरांतील ऑनलाईन पद्धतीने लसीकरण वगळता सर्वत्र टोकन पद्धतीने लसीकरण चालू आहे, असे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.