पितृपक्षात शास्त्रोक्त महालय श्राद्धविधी करण्याचे महत्त्व लक्षात घ्या आणि ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर शास्त्र विधानानुसार पुढीलप्रमाणे श्राद्धविधी करा !
वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती अन् साधकांसाठी महत्त्वाची सूचना !
‘भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या (२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१) या कालावधीत पितृपक्ष आहे. ‘सर्व पितर तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी पितृपक्षात सर्वांनी महालय श्राद्ध करायला हवे.
१. पितृपक्षात महालय श्राद्धविधी करण्याचे महत्त्व !
पितृपक्ष काळात कुळातील सर्व पितर अन्न आणि उदक (पाणी) यांच्या अपेक्षेने आपल्या वंशजांजवळ येतात. पितृपक्षात पितृलोक पृथ्वीलोकाच्या सर्वाधिक जवळ येत असल्याने पितरांना दिलेले अन्न, उदक (पाणी) आणि पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोचते. त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात. श्राद्धविधी केल्याने पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला साहाय्य होते.
२. ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर पितृपक्षात शास्त्रोक्त महालय श्राद्धविधी करणे शक्य नसल्यास काय करावे ?
सध्याच्या ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी शास्त्रोक्त श्राद्धविधी करण्यास मर्यादा आहेत. अशा स्थितीत ‘श्राद्ध करण्याविषयी शास्त्रविधान काय आहे ?’, हे पुढे दिले आहे.
२ अ. आमश्राद्ध करणे : ‘आपत्काली, भार्येच्या अभावी, तीर्थक्षेत्री आणि संक्रांतीच्या दिवशी आमश्राद्ध करावे’, असे कात्यायनाचे वचन आहे. काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणे शक्य न झाल्यास संकल्पपूर्वक ‘आमश्राद्ध’ करावे. आपल्या क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तेल, तूप, साखर, बटाटे, नारळ, १ सुपारी, २ विड्याची पाने, १ नाणे इत्यादी साहित्य तबकात ठेवावे. ‘आमान्नस्थित श्री महाविष्णवे नमः ।’ हा नाममंत्र म्हणत त्यावर गंध, अक्षता, फूल आणि तुळशीचे पान एकत्रित वहावे. ते साहित्य एखाद्या पुरोहिताला द्यावे. पुरोहित उपलब्ध नसल्यास वेदपाठशाळा, गोशाळा अथवा देवस्थान यांना दान करावे.
२ आ. ‘हिरण्य श्राद्ध’ करणे : वरील करणेही शक्य नसल्यास संकल्पपूर्वक ‘हिरण्य श्राद्ध’ करावे, म्हणजे आपल्या क्षमतेनुसार व्यावहारिक द्रव्य (पैसे) एका तबकात ठेवावेत. ‘हिरण्यस्थित श्री महाविष्णवे नमः ।’ किंवा ‘द्रव्यस्थित श्री महाविष्णवे नमः ।’ असे म्हणून त्यावर गंध, अक्षता, फूल आणि तुळशीचे पान एकत्रित वहावे. नंतर ते धन पुरोहितांना अर्पण करावे. पुरोहित उपलब्ध नसल्यास वेदपाठशाळा, गोशाळा अथवा देवस्थान यांना दान करावे.
२ इ. गोग्रास देणे : ज्यांना आमश्राद्ध करणे शक्य नाही, त्यांनी गोग्रास द्यावा. जेथे गोग्रास देणे शक्य नसेल, त्यांनी जवळपासच्या गोशाळेला संपर्क करून गोग्रासासाठी म्हणून काही पैसे अर्पण करावेत.
वरीलपैकी आमश्राद्ध, हिरण्यश्राद्ध किंवा गोग्रास समर्पण केल्यानंतर तीळ तर्पण करावे. पंचपात्रीत (पेल्यात) पाणी घ्यावे. त्यात थोडे काळे तीळ टाकावे. अशा प्रकारे तीलोदक सिद्ध होते. तीलोदक सिद्ध झाल्यावर हयात नसलेल्या पितरांची नावे घेऊन उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यामधून त्यांना तीलोदक समर्पण करावे. गेलेल्या व्यक्तीचे नाव ठाऊक नसेल; पण ती व्यक्ती ज्ञात असल्यास त्या व्यक्तीचे स्मरण करून तीलोदक समर्पण करावे. एरव्ही या सर्व विधींच्या वेळी पुरोहित मंत्र म्हणतात आणि आपण कृती करतो. पुरोहित उपलब्ध असल्यास त्यांना बोलावून वरीलप्रमाणे विधी करावेत. पुरोहित उपलब्ध नसल्यास या लिखाणात दिलेल्या माहितीप्रमाणे भाव ठेवून विधी करावा.
एखाद्याला कोणताही विधी करणे शक्य नसेल, तर त्यांनी निदान तीळतर्पण करावे.
२ उ. ज्यांना वरीलपैकी काहीही करता येणे शक्य नसेल, त्यांनी धर्मकार्यासाठी समर्पित एखाद्या आध्यात्मिक संस्थेला अर्पण करावे.
३. श्राद्धविधी करतांना करावयाची प्रार्थना !
‘शास्त्रमार्गाला अनुसरून प्राप्त परिस्थितीत आमश्राद्ध, हिरण्य श्राद्ध किंवा तर्पण विधी (वरीलपैकी जे केले आहे, त्याचा उल्लेख करावा) केले आहे. याद्वारे पितरांना अन्न आणि पाणी मिळू दे. या दानाने सर्व पितर तृप्त होवोत. त्यांची आमच्यावर कृपादृष्टी राहू दे. आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त होवोत. दत्तगुरूंच्या कृपेने त्यांना पुढची गती प्राप्त होऊ दे’, अशी श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करावी.
कोरोना महामारीमुळे सद्य:स्थितीत पालट होऊन ती पूर्वपदावर आल्यास विधीपूर्वक पिंडदान करून श्राद्ध करावे.’
– श्री. दामोदर वझे, संचालक, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.८.२०२०)