बुद्धी, तिची अवलंबता आणि उत्पत्तीच्या मर्यादा !
सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?
बुद्धी स्वतः प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या आधाराने पुढे जात असल्याने तिला स्वतःहून कुठल्याही मूलभूत पदार्थाचा शोध लावणे शक्य नाही, हे जाणा !
पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. १२ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मानवी बुद्धी आणि तिच्या निर्णयांतील योग्य-अयोग्यता !’, यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया. (भाग १०)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510329.html |
३३. आधारभूत असणारी बुद्धी !
३३ अ. बुद्धीला कर्मेंद्रिये किंवा अन्य मनुष्य यांचा आधार घ्यावा लागणे : बुद्धीला कोणतेही कार्य करण्यासाठी स्वतःच्या कर्मेंद्रियांच्या आधारावर किंवा दुसर्या मनुष्यावर अवलंबून रहावे लागते.
३३ आ. बुद्धीला परिस्थितीच्या आधारावर अवलंबून रहावे लागणे : बुद्धीला परिस्थितीच्या आधारावरसुद्धा अवलंबून रहावे लागते; कारण आपण पहातो की, कधी कधी अधिक प्रयत्न न करतासुद्धा एखादी वस्तू सहज प्राप्त होते आणि कधी कधी बुद्धी पणाला लावूनसुद्धा किंवा पुष्कळ प्रयत्न केल्यावरही ती गोष्ट प्राप्त होत नाही.
३३ इ. बुद्धी बाह्य अडचणींवरही अवलंबून असणे : कधी कधी बाह्य अडचणी अशा येतात की, ज्यांचे अनुमान आपण आधीच करू शकत नाही. त्यामुळे बुद्धीद्वारे घेतलेले निर्णय कधी कधी पूर्ण होत नाहीत.
३४. बुद्धीच्या मर्यादा !
३४ अ. पंचमहाभूते, झाडे, वनस्पती आणि सूर्य-चंद्र यांची उत्पत्ती मनुष्याच्या आधीपासून झालेली असल्याने त्या सर्वांना सिद्ध करणे मनुष्याला अशक्य असणे : पंचमहाभूते म्हणजेच, पृथ्वी, जल, वायू, अग्नि आणि आकाश यांना सिद्ध करणे मनुष्याला अशक्यच आहे; कारण या सर्व वस्तू मनुष्याच्या बुद्धीच्या उत्पत्तीपूर्वीच निर्माण झालेल्या आहेत. याच पंचमहाभूतांच्या आधारावर सर्वांचे जीवन चालत असते. झाडे, झुडपे, वनस्पती यांची उत्पत्तीसुद्धा मनुष्य पृथ्वीवर येण्यापूर्वीच झालेली आहे. सूर्य, चंद्र, नक्षत्रे इत्यादी आणि त्यांचे आकाशात फिरण्याचे नियम बनवणे मनुष्याला शक्यच नाही. हे सर्व पदार्थ मनुष्याच्या उत्पत्तीपूर्वीचे आहेत.
३४ आ. बुद्धीला मूलभूत पदार्थांचा शोध लावणे शक्य नसणे : बुद्धी स्वतः प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या सीमेत असते. ती त्यांच्याच आधाराने पुढे जात असते; म्हणून बुद्धीला स्वतःहून कुठल्याही मूलभूत पदार्थाचा शोध लावणे शक्य नाही.
३५. बुद्धी आत्मसात् करू शकत नसलेल्या गोष्टी
अ. विज्ञानाचा नियम आहे की, कोणत्याही वस्तूचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक असू शकत नाही; परंतु त्यामागील कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी ती गोष्ट अनुभवणे कठीण होते.
आ. आपल्याला द्वितीय व्युत्पन्न (Second Derivative) होण्यापेक्षा अधिक गोष्टींना समजून घेणे शक्य होत नाही, उदा. प्रवेग (त्वरण -Acceleration) आणि वक्रता (Curvature) यांचे परिवर्तन अनुभवणे हे मनुष्यासाठी कठीण होऊन जाते.
इ. एखाद्या गोष्टीच्या उत्पत्तीचे कारण जाणून घेण्यापूर्वी कधी कधी तिची उत्पत्ती आधी होते आणि नंतर तिच्या उत्पत्तीचे कारण समजते, उदा. सायकल (दुचाकी) आणि विमानाचा पंखा.
३६. भौतिक निष्कर्ष समजण्यातील मर्यादा
शालेय विद्यार्थ्यांनीही स्वतः अभ्यासांती अनुभवले असेल की, भौतिक विज्ञानाचे काही निष्कर्ष समजणे कठीण असते.
३७. गृहितके
विज्ञानात काही गोष्टी गृहीत धरलेल्या (परिकल्पना) (Hypothesis) असतात. यावरून हेच लक्षात येते की, बुद्धीला प्रत्यक्ष घटनेचे कारण शोधणे शक्य होत नाही.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/513998.html |
– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)