कोल्हापूर शहरातील राजाराम चौकातील श्री गणेशमूर्तीवरील दीड किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी !
समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! – संपादक
कोल्हापूर – येथील टिंबर मार्केट परिसरातील राजाराम चौक येथील छत्रपती राजाराम चौक मित्र मंडळाच्या श्री गणेशमूर्तीवरील दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी मंडळाच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार देण्यात आली आहे.
राजाराम चौक मित्रमंडळाने ५ फूट उंचीच्या श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मूर्तीला चांदीचे दागिने घालण्यात आले आहेत. येथे दागिने असल्याने कार्यकर्ते रात्री मंडपातच झोपतात. १५ सप्टेंबरला सकाळी उठल्यावर कार्यकर्त्यांना मूर्तीच्या अंगावरील चांदीचे काही दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी पृथ्वीराज राजेंद्र नरके यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. (गणेशोत्सवात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केलेले असतात. असे असतांना चोरटे देवतांच्या मूर्तीवरील दागिन्यांची चोरी करतातच कशी ? हे चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे द्योतक आहे ! हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक) पहाटे तीन ते साडेपाच या वेळेत ही चोरी झाली असावी. चोरट्यांनी १ सहस्र २६० ग्रॅम वजनाचे चांदीचे तोडे, २०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या खड्याच्या ४ अंगठ्या, असे एकूण ६८ सहस्र ६२० रुपये मूल्याचे दागिने चोरून नेले.