दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांकडून होणार्‍या लहान-मोठ्या त्रुटींमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विकतेवर होणारा परिणाम

नियतकालिकांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांची वैज्ञानिक चाचणी

‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे ध्येय हे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीचे आहे. दैनिकातून राष्ट्र अन् धर्म यांच्या संदर्भातील मार्गदर्शक लेख प्रसिद्ध केले जातात. तसेच हिंदु धर्मातील प्रमुख सण अन् उत्सव यांमागील अध्यात्मशास्त्र, तसेच ते साजरे करण्याच्या योग्य पद्धती आदींविषयीची माहिती प्रसिद्ध केली जाते. दैनिकाच्या माध्यमातून सार्वजनिक उत्सवातील गैरप्रकारांविरुद्ध जनजागृतीही केली जाते. यामुळे समाजाला धर्मशिक्षण मिळून तो धर्माचरणी बनतो. ‘समाजाला काय आवडते, यापेक्षा समाजासाठी काय आवश्यक आहे’, याचा विचार केला जातो. देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचे वृत्तांकन करतांना त्या घटनांकडे पहाण्याची योग्य दृष्टी देणारे दृष्टीकोनही दैनिकामध्ये प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे समाजाला योग्य-अयोग्य काय, हे लक्षात येते.

दैनिक ‘सनातन प्रभात’ भाषाशुद्धीला महत्त्व देते; कारण भाषा जेवढी शुद्ध तेवढी ‘सनातन प्रभात’मधून चांगली स्पंदने प्रक्षेपित होतात. दैनिकात संस्कृत सुभाषिते, श्लोक, संतांची सुवचने अर्थासहित प्रसिद्ध केली जातात. यामुळे दैनिकाच्या सात्त्विकतेत मोलाची भर पडते. दैनिकाच्या सात्त्विकतेच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने विपुल संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन वेळोवेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्धही करण्यात आलेले आहे.

दैनिकातील वृत्तांचे टंकलेखन, संकलन अन् मुद्रितशोधन, विज्ञापनांची संरचना इत्यादी सेवा साधक त्यांची ‘साधना’ म्हणून करतात. ‘दैनिकाशी संबंधित सेवा करतांना साधकांतील स्वभावदोष आणि अहं यांमुळे त्यांच्याकडून होणार्‍या लहान-मोठ्या त्रुटींमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विकतेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अन्य सूत्रे पुढे दिली आहेत.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २४.५.२०२१ या दिवशीच्या अंकामध्ये सर्वाधिक चुका होत्या. तुलनेसाठी २४.५.२०२१ या दिवशीच्या अंकाची आणि अन्य दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.

१ अ. सर्वाधिक चुका असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून येणे : अन्य दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. याउलट सर्वाधिक चुका असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकामध्ये मात्र पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा अन् अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

सौ. मधुरा कर्वे

२. निष्कर्ष

अन्य दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकापेक्षा सर्वाधिक चुका असलेल्या दैनिकातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण तिपटीने अल्प आहे. साधकांकडून झालेल्या त्रुटींमुळे (चुकांमुळे) दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदने निर्माण होऊन दैनिकाची सात्त्विकता पुष्कळ प्रमाणात न्यून झाली. ‘साधकांकडून होणार्‍या त्रुटींचा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विकतेवर किती सूक्ष्म परिणाम होतो’, हेच यातून लक्षात येते.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दैनिकातील चुकांचा अभ्यास करण्यामागील उद्देश

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘बातम्या चुकीच्या छापल्या’, यासारख्या गंभीर चुका होत नाहीत, तर व्याकरण आणि वाक्यरचना यांसारख्या थोड्या चुका आहेत. या टप्प्याच्या चुकांमुळे वाचकांची काही हानी होत नाही; परंतु यामुळे गेल्या १०-१५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांची प्रगती लवकर होत नाही. त्यांच्या जीवनातील साधनेचा काळ या चुकांमुळे वाया जाऊ नये, यासाठी मी या चुकांचा अभ्यास करत आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

४. साधकांनो, ‘सेवेतील लहान-मोठ्या त्रुटींमुळे आपल्या साधनेची हानी तर होतेच; पण दैनिक ‘सनातन प्रभात’ची सात्त्विकताही पुष्कळ न्यून होते’, हे लक्षात घेऊन चुकांविरहित आणि परिपूर्ण सेवा करा !

साधकांतील स्वभावदोष आणि अहं (मीपणाची जाणीव) यांमुळे त्यांच्याकडून सेवेत लहान-मोठ्या चुका होतात. अनेक साधकांचा कल साधनेपेक्षा कार्याकडे अधिक असतो. त्यामुळे सेवा उरकण्याचा भाग होतो. ‘सेवेच्या माध्यमातून मला स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून ईश्वरी चैतन्य ग्रहण करायचे आहे’, याचा त्यांना विसर पडतो. सेवेत होणार्‍या चुकांचा अभ्यास करणे, त्याच त्याच चुका पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना काढणे, चुकांसाठी योग्य प्रायश्चित्त घेणे (चुकांमुळे साधकाची साधना व्यय होते; योग्य प्रायश्चित्त घेतल्याने चुकांचे काही प्रमाणात तरी परिमार्जन होते आणि साधकांची साधना वाचते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना नेहमी योग्य प्रायश्चित्त घेण्यास सांगतात.) इत्यादी गोष्टींचा संस्कार परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांवर केला आहे. आजही याची जाणीव ते साधकांना सतत करून देत असतात. साधकांनी स्वतःकडून होणार्‍या चुकांचा वरवर अभ्यास करून तात्पुरत्या उपाययोजना काढण्यापेक्षा ‘या चुकांमुळे माझ्या साधनेची आणि गुरुकार्याचीही किती हानी होत आहे’, हे लक्षात घेऊन अंतर्मुख होऊन स्वतःकडून होणार्‍या चुकांचे सखोल चिंतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे साधकांना ‘साधनेत मी कुठे अल्प पडतो?’, हे लक्षात येऊन त्यावर ठोस उपाययोजना काढून नेटाने प्रयत्न वाढवता येतील. साधकांनो, कोणतीही सेवा चुकांविरहित आणि परिपूर्ण केली, तर ती देवापर्यंत निश्चित पोचते’, हे लक्षात घ्या आणि तळमळीने प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.९.२०२१)

ई-मेल : mav.research2014@gmail.com

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.