अलीगड (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या नेत्याच्या अटकेसाठी आलेल्या बंगाल पोलिसांना मारहाण !
अलीगड (उत्तरप्रदेश) – भाजपच्या एका नेत्याला अटक करण्यासाठी आलेल्या बंगाल पोलिसांना मारहाण करण्यात आली.
१. बंगालमध्ये वर्ष २०१७ मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. यानंतर भाजपचे नेते योगेश वार्ष्णेय यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करून त्यांचे शिर आणणार्याला ११ लाख रुपये देण्याचे घोषित केले होते. यावरून बंगालमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या विधानाचे पडसाद संसदेतही उमटले होते.
२. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी बंगाल पोलिसांतील दोघे जण अलीगड येथे आले होते. त्या वेळी वार्ष्णेय यांच्या समर्थकांनी या दोघा पोलिसांना एका खोलीत बंद करून त्यांना मारहाण केली. याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी या पोलिसांची सुटका केली. खासदार सतीश गौतम, आमदार आणि अन्य भाजपचे पदाधिकारीही घटनास्थळी पोचले. यापूर्वीही पोलीस वार्ष्णेय यांच्या अटकेसाठी अलीगड येथे आले होते.
३. योगेश वार्ष्णेय यांनी आरोप केला की, बंगाल पोलीस साध्या वेशामध्ये घरात घुसले होते. त्यांनी घरातील महिलांशी अश्लील वर्तन केले. या वेळी आरडाओरडा केल्यावर शेजारी रहाणार्या नगरसेविका घरात आल्यावर त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याची माहिती मिळाल्यावर कार्यकर्त्यांनी पोलिसांना मारहाण केली.