वाहनधारकांनी दंडाची थकित रक्कम २४ सप्टेंबरपर्यंत भरावी ! – अमित यादव, पोलीस निरीक्षक, सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखा
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – ज्या वाहनचालकांवर दंड न भरल्याच्या तक्रारी (केसेस) आहेत, त्या वाहनधारकांनी दंडाची थकित असलेली रक्कम २४ सप्टेंबरपर्यंत भरावी. सर्व पोलीस ठाणे, जिल्हा वाहतूक शाखा, खारेपाटण आणि पत्रादेवी येथील तपासणी नाकी, या ठिकाणी दंडाची रक्कम स्वीकारली जाणार आहे, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले.
कोरोनाच्या काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड आकारलेले वाहनचालक आणि वाहनांचे मालक मिळून एकूण ६३ सहस्र ८९७ तक्रारी करण्यात आल्या आहेत. यात १ कोटी ६५ लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार विधी आणि सेवा प्राधिकरणाच्या वतीने २५ सप्टेंबरला ‘लोक न्यायालय (अदालत)’ भरवण्यात येणार आहे. जे वाहनधारक दंडाची थकित रक्कम भरणार नाहीत, त्यांना २५ सप्टेंबरला ‘लोक न्यायालयात’ दंडाची थकित रक्कम भरण्याकरिता नोटीस पाठवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९३०७६८०६०१ आणि ९६७३९०७४९८ या ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर संपर्क साधावा. वाहतुकीचे नियम पाळून रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे.