विशाळगडच्या समस्यांच्या विषयात लक्ष घालून पर्यावरण मंत्र्यांसमवेत बैठकीचे नियोजन करीन ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना
‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने खासदार धैर्यशील माने यांची घेतली भेट
कोल्हापूर, १७ सप्टेंबर (वार्ता.) – पन्हाळा ते विशाळगड या संदर्भात जो दैदिप्यमान इतिहास आहे, तो लोकांसमोर आणण्यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावणे, तसेच अन्य गोष्टींच्या संदर्भातील प्रस्ताव कृती समितीने सादर करावा. विशाळगड येथील मंदिरांचा जीर्णाेद्धार आणि नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीचे सुशोभिकरण यांसाठी मी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देईन. विशाळगडच्या संदर्भात कृती समितीसमवेत एक सविस्तर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन. विशाळगडाच्या विषयात लक्ष घालून पर्यावरण मंत्र्यांसमवेत बैठकीचे नियोजनही करीन, अशी आश्वासने शिवसेनेचे खासदार श्री. धैर्यशील माने यांनी दिली.
‘ऐतिहासिक विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवणे, या गडाची माहिती देणारे फलक सर्वत्र लावणे, तसेच गडाचे सुशोभीकरण करणे आदी गोष्टींसाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने १७ सप्टेंबर या दिवशी खासदार श्री. माने यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी खासदार श्री. माने यांना कृती समितीने विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आतापर्यंत केलेल्या कायाची सविस्तर माहिती दिली. या भेटीसाठी कृती समितीचे सदस्य श्री. सुरेश यादव यांनी पुढाकार घेतला. या भेटीच्या प्रसंगी कृती समितीचे सदस्य तथा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शिरोली येथील सरपंच शशिकांत (भाऊ) खवरे, कृती समितीचे सदस्य श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे कोकण, तथा गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, श्री. शिवानंद स्वामी, श्री. विपुल भोपळे आणि सौ. राजश्री तिवारी या उपस्थित होत्या.