तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिदिन श्री गणेशाचा सामूहिक नामजप !
नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर), १७ सप्टेंबर (वार्ता.) – तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती आणि ५ दिवसांचा उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाच्या कालावधीत गणेशोत्सवाच्या निमित्ताने १० ते १४ सप्टेंबरअखेर प्रतिदिन रात्री ९ ते ९.३० या वेळेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी श्री गणेशाचा सामूहिक नामजप घेण्यात आला. या नामजपासाठी सर्वसाधारणपणे ३२ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
उत्सवात पहिल्या दिवशी म्हणजे १० सप्टेंबर या दिवशी सकाळी सनातन संस्थेच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्या साधिका आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा कोठावळे यांनी श्री गणेशचतुर्थी साजरी करण्याचे महत्त्व, श्री गणेशाला लाल-फूल, दुर्वा वहाण्याचे महत्त्व, तसेच अन्य माहिती दिली. याचा लाभ १०० विद्यार्थ्यांनी घेतला. उत्सवाच्या समारोपप्रसंगी येथील विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत आदर्श विसर्जन मिरवणूक काढली, तसेच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन शास्त्राप्रमाणे वारणा नदीत वहात्या पाण्यात करण्यात आले.
विशेष
१. जेथे श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्या सभागृहात श्री गणेशाविषयी अधिक माहिती देणारी भित्तीपत्रकेही लावण्यात आली आहेत.
२. नामजप करणार्या विद्यार्थ्यांनी ५ दिवसांचा उत्सव संपल्यानंतरही अनंतचतुर्दशीपर्यंत जप करणार असल्याचे सांगितले.
प्रतिक्रिया आणि अनुभूती
१. दंतरोगतज्ञ रक्षा महेंद्रकर – नामजप करतांना श्री गणेशाची पूजा करत आहे, असा भाव ठेवून नामजप केला. त्यामुळे नामजपाच्या वेळी इतर विचार अल्प झाल्याचे अनुभवले.
२. दंतरोगतज्ञ अमित बनकर – परीक्षेचा अभ्यास चालू आहे. या अगोदर अपेक्षित अशी एकाग्रता साधली न गेल्याने अभ्यास अल्प होत असे. आता जप करत असल्याने १ ते दीड घंटा अभ्यास एकाग्रतेने होत आहे.
३. दंतरोगतज्ञ सविता ठक्कनवार (एम्.डी.एस्.) – मी पहिल्यांदाच नामजप केला. जप करण्याच्या अगोदर इतका वेळ बसू शकेन का ? असे वाटत होते; मात्र जप करतांना वेळ कसा गेला, हे कळलेच नाही. एकट्याने जप करतांना तो प्रयत्नपूर्वक करावा लागत होता, याउलट सामूहिक जप करतांना तो सहजतेने झाला.
४. श्री. नीलेश कापसे आणि कु. अनुराधा सनसुद्दी, दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी – दिवसभर सिद्धता, तसेच अन्य काही ना काही गडबड चालू असायची. यामुळे सायंकाळी थकून जात असे; मात्र नामजप झाल्यावर हलके वाटत होते, तसेच उत्साह वाटत होता.