शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी रुपये मागितले ! – सचिन वाझे, बडतर्फ पोलीस अधिकारी
मुंबई – शरद पवार यांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुख यांनी २ कोटी रुपये मागितले होते, असा खुलासा सचिन वाझे यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे (‘ईडी’कडे) केला आहे, असे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले आहे. ‘शरद पवार यांनी मला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध केला होता. याविषयी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पवार यांची मनधरणी करण्यासाठी माझ्याकडे पैसे मागितले होते. पैसे देण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतरही देशमुख यांनी ते वेळेवर देण्यास सांगितले होते’, असा खुलासा सचिन वाझे यांनी केला आहे. (हे सर्व धक्कादायक असून यावरून पोलीस खात्याचा कारभार कशाप्रकारे चालत असेल, हे लक्षात येते. भ्रष्टाचाराची लागण झालेली यंत्रणा सर्वसामान्यांना न्याय काय देणार ? – संपादक)
सचिन वाझे पुढे म्हणाले की, जुलै २०२० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १० पोलीस उपायुक्तांचे स्थानांतराचे आदेश काढले होते. या आदेशावर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहनमंत्री अनिल परब अप्रसन्न होते. त्यामुळे सिंह यांनी आदेश मागे घेतला होता. ४ दिवसांनंतर मला कळले की, पैसे आणि इतर काही तडजोडी यांनंतर हा आदेश पुन्हा काढण्यात आला. या पोलीस अधिकार्यांकडून एकूण ४० कोटी रुपये घेण्यात आले होते. त्यांपैकी २० कोटी रुपये संजीव पलांडे यांच्याद्वारे अनिल देशमुख यांना, तर २० कोटी रुपये परिवहन अधिकारी बजरंग करमाटे यांच्याद्वारे अनिल परब यांना देण्यात आले होते. वाझे यांनी सांगितले की, अनिल देशमुख यांनी प्रत्येक बारमालकाकडून ३ लाख रुपये गोळा करण्याचे आदेश देत १ सहस्र ७५० बार आणि रेस्टॉरंट यांची सूची दिली होती. डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ४ कोटी ७० लाख रुपये गोळा करण्यात आले. (प्रत्येक खाते भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. बहुतांश जण त्यात सहभागी असल्याने कोण कुणावर कारवाई करणार ? असा प्रश्न आहे. – संपादक) त्यानंतर जानेवारी मासात अनिल देशमुख यांनी मला त्यांच्या वैयक्तिक भ्रमणभाष क्रमांकावरून माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क केला आणि मला आजपर्यंत गोळा केलेली रक्कम कुंदन शिंदे यांच्याकडे सुपुर्द करण्याच्या सूचना केल्या. नंतर कुंदन शिंदे यांनी मला त्वरित संपर्क केला आणि मला सह्याद्रीच्या (मुंबई येथील शासकीय अतिथीगृहाच्या) बाहेर भेटायला बोलावले. तेथे मी काळ्या रंगाच्या मर्सिडीज गाडीतून आलो आणि १ कोटी ६० लाख रुपये भरलेल्या पाच पिशव्या शिंदे यांना दिल्या, असेही वाझे यांनी अधिकार्यांना सांगितले.