माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आयकर विभागाची धाड
मुंबई, १७ सप्टेंबर (वार्ता.) – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आयकर विभागाने १७ सप्टेंबर या दिवशी धाड घातली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे २५ हून अधिक अधिकारी त्यांच्या घरी आले; त्यांपैकी काही अधिकारी हे त्यांच्या काटोल येथील वडिलोपार्जित घरी गेल्याची माहिती पुढे आली आहे. त्या वेळी त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया कार स्फोटक प्रकरण या दोन्ही प्रकरणांत मुंबई पोलीस दलात मोठे पालट झाले. अनेक पोलीस अधिकार्यांचे स्थानांतर (बदली) करण्यात आले. यात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही पदावरून दूर करण्यात आले. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार, पब आणि उपाहारगृह यांच्या मालकांकडून १०० कोटी रुपये प्रतिमास वसूल करण्याचे ध्येय दिले असल्याचे लिहिले होते. या पत्रामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. यापूर्वीही अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी धाड घातली होती.