मुंबई येथील शिवछाया मित्र मंडळाचा गणेशोत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा !
नवी मुंबई, १७ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाने या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. या वर्षी गणेशोत्सवाचे ५१ वे वर्षे आहे. मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरे, विनामूल्य चष्मेवाटप, वृक्षारोपण, आपद़्ग्रस्तांना साहाय्य, अन्नदान, शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरिब महिलांना शिवणयंत्रांचे वाटप आदी उपक्रम मंडळाने राबवले आहेत. रक्तदान शिबिरात ३३ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती यांनी दिली.
मंडळाने कोरोनाग्रस्तांना साहाय्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस १ लाख रुपयांचे साहाय्य केले आहे, तसेच नुकतेच चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
शिवछाया मित्र मंडळाच्या या सामाजिक कार्याची नोंद घेऊन मंडळाला नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई पोलीस, दैनिक ‘लोकसत्ता’, दैनिक ‘सकाळ’, दैनिक ‘लोकमत’ यांनी मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या विषयांचे समाज प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात येतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘विळखा कोरोनाचा’ हा देखावा साकारण्यात आला होता. यात कोरोनाची सद्यःस्थिती, उपाययोजना यांविषयीचीच्या माहिती देऊन जनजागृती करण्यात आली होती.