काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक मला त्रास द्यायला लागले, तर मी भाजपला बोलावून घेतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचा रावसाहेब दानवे यांचा दावा !
राज्यात शिवसेना-भाजप युती होण्याविषयी चर्चा चालू !
संभाजीनगर – ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आपल्याला परत एकत्र (युती करण्याविषयी) यायला हवे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक मला त्रास द्यायला लागले, तर मी भाजपला बोलावून घेतो’, असे मला सांगितले आहे’, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी १७ सप्टेंबर या दिवशी येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला.
संभाजीनगर जिल्हा परिषद इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘व्यासपिठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी एकत्र आलो, तर भावी सहकारी’, असा भाषणाचा प्रारंभ केला. त्या वेळी व्यासपिठावर केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून पुढे भाजप-शिवसेना युती होण्याविषयी राजकीय तर्क-वितर्क चालू झाले आहेत. असे असतांना दानवे यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया देऊन विषयाला वेगळे वळण दिले आहे.
अनैसर्गिक आघाडी पुष्कळ काळ टीकत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
‘‘राजकारणात कधी काहीही होऊ शकते. आम्ही एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत, तसेच ही जी अनैसर्गिक आघाडी सिद्ध झाली आहे, ती फार काळ टिकत नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत’’, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.