(म्हणे) ‘अनेक लोकांनी माझ्या मताशी सहमती दर्शवली आहे !’ – जावेद अख्तर, गीतकार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांना पाठिंबा देणार्यांना ‘तालिबानी’ म्हटल्याचे प्रकरण
नसानसांत हिंदुद्वेष भिनलेल्या जावेद अख्तर यांना समर्थन देणारे त्यांच्याच मानसिकतेचे आहेत, हे सांगायला वेगळ्या आरशाची आवश्यकता नाही ! – संपादक
मुंबई – गीतकार जावेद अख्तर यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘तालिबानी हे रानटी, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांना पाठिंबा देणारे अशाच (तालिबानी) मानसिकतेचे आहेत’, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांतून जोरदार टीका करण्यात आली. या टीकेनंतर अख्तर यांनी दैनिक ‘सामना’मध्ये लेख लिहून स्वतःची भूमिका मांडली. त्यांनी या लेखात म्हटले आहे की, काही लोकांनी शक्य तितक्या तीव्र शब्दांत निषेध आणि संताप व्यक्त केला, तर अनेक लोकांनी माझ्या वक्तव्याचे समर्थन करणारे संदेश पाठवून माझ्या विचारांशी सहमती दर्शवली आहे. तथापि माझ्यावर आरोप करणार्यांना उत्तर देण्यासाठी मी हा लेख लिहीत आहे.
(म्हणे) ‘लोकांमध्ये फूट पाडणार्या कोणत्याही विचारसरणीला विरोध आहे !’
तालिबानला कोणतेही अल्पसंख्यांक समुदाय अजिबात आवडत नाहीत; त्याचप्रमाणे हिंदु उजव्या विचारसरणीनेही अल्पसंख्यांकांविषयी त्यांच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आणि भावना आहेत, हे वेळोवेळी त्यांची भाषणे, घोषणा अन् कृत्ये यांमधून स्पष्ट केले आहे. (‘आपला तो बाब्या, दुसर्याचे ते कारटे’ ही हिंदुद्वेष्टी वृत्ती असणारे अख्तर ! तालिबान्यांप्रमाणे हिंदू अल्पसंख्यांकांना सतत बंदुकीच्या फैरी झाडून गोळ्या घालतांना दिसतात का ? अल्पसंख्यांक हे हिंदूंवर करत असलेल्या अत्याचारांविषयी अख्तर यांनी आधी बोलावे आणि मग हिंदू त्यांच्याविषयी काय बोलतात, ते सांगावे ! – संपादक) तालिबान आणि हे कट्टर गट यांचामध्ये भेद एवढाच आहे की, तालिबानकडे आज अफगाणिस्तानची अनिर्बंध सत्ता आहे आणि त्यांना प्रश्न विचारणारे तेथे कुणीही नाही, तर हिंदुस्थानात तालिबानी विचारसरणीच्या हिंदुस्थानी आवृत्तीला मोठ्या प्रमाणात विरोध आहे. (अख्तर यांच्यासारख्या ४ टोळक्यांचा विरोध म्हणजे मोठ्या प्रमाणात विरोध का ? – संपादक) आपली राज्यघटना धर्म, समुदाय, जात किंवा लिंग यांच्या आधारावर भेदभाव करत नाही. धर्म, जात आणि पंथ यांच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणार्या कोणत्याही विचारसरणीला माझा विरोध आहे अन् अशा प्रकारच्या कोणत्याही भेदभावाच्या विरोधात असलेल्या सर्वांच्या पाठीशी मी उभा राहिलो आहे. (हिंदूंच्या विरोधात सतत आगपाखड करून समाजात तेढ निर्माण करण्याचा अख्तर यांचाच इतिहास राहिलेला आहे, हे सूज्ञ जनता जाणून आहे ! – संपादक)
(म्हणे) ‘तालिबान आणि हिंदु उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत बरेच साम्य !’
तालिबान आणि हिंदु उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत मला बरेच साम्य आढळते. तालिबान धर्मावर आधारित ‘इस्लामी सरकार’ स्थापन करत आहे, तर हिंदु उजव्या विचारसरणीला ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करायची आहे. (हिंदु राष्ट्राची संकल्पना ही छपत्रती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे आदर्श राज्याची संकल्पना आहे. त्याची तुलना तालिबानशी करणार्या अख्तर यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी ! – संपादक)