सर्वोच्च न्यायालयाने शेवटी भाग्यनगर येथील हुसैन सागर तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्याची संमती दिली !
ही अनुमती शेवटची असेल ! – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
भारतात प्रदूषणाला कारणीभूत असणार्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करून वर्षातून एकदा येणार्या हिंदूंच्या श्री गणोशोत्सवावर विविध निर्बंध लादले जातात. हिंदूंचे धर्मशास्त्र आणि परंपरा यांप्रमाणे सण अन् उत्सव साजरे करण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! – संपादक
भाग्यनगर – सर्वोच्च न्यायालयाने येथील प्रसिद्ध हुसैन सागर तलावामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची अनुमती दिली. त्याच वेळी ‘ही अनुमती केवळ याच वर्षासाठी देण्यात येत आहे’, हेही न्यायालयाने स्पष्ट केले. (प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात आलेल्या गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषण होत नाही, हे वर्ष २०१५ मध्ये महाराष्ट्रातील सांगलीच्या ‘एन्व्हायरंमेंट प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’ने केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी न्यायालयात ही भूमिका मांडावी, असे धर्मप्रेमी हिंदूंना वाटते. – संपादक) पुढील वर्षी या तलावामध्ये गणेश विसर्जनासाठी परवानगी देण्यात येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र त्यांना सादर करावे, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने तेलंगण सरकारला दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील या त्रिसदस्यीय पिठाने सांगितले की, शहरामध्ये ही वारंवार उद्भवणारी समस्या आहे. अनेक निर्देश दिल्यावरही राज्य सरकारने तेथे मूर्ती विसर्जन आणि प्रदूषण यांवर प्रतिबंध लावण्याविषयी तेलंगण उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय पिठाने पुढील वर्षीसाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देतांना सांगितले की, ‘विसर्जनासाठी या तलावाचा वापर करण्याची आम्ही दिलेल्या संमतीची ही शेवटची वेळ आहे.’ तेलंगण उच्च न्यायालयाने हुसैन सागर तलावासमवेत शहरातील अन्य जलाशयांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावर प्रतिबंध लावण्याचा आदेश दिला होता. १३ सप्टेंबर या दिवशी या आदेशामध्ये सुधारणा करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता.
Supreme Court Permits Immersion Of PoP Ganesh Idols In Hyderabad’s Hussain Sagar Lake This Year As ‘Last Chance’ @SrishtiOjha11 https://t.co/ZQ0ol348g9
— Live Law (@LiveLawIndia) September 16, 2021
हुसैन सागर तलावामधील मूर्ती विसर्जन प्रतिकात्मक असेल ! – सरकारी महाधिवक्ता तुषार मेहता
ज्याप्रकारे विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन केले जाते, त्या आधारावर देवतेची पवित्रके आलेल्या आणि १० दिवस भक्तीभावाने पूजलेल्या देवतेच्या मूर्तीचे प्रतिकात्मक विसर्जन करणे, हे सर्वथा धर्मशास्त्रविरोधी आणि भक्तांच्या श्रद्धांना पायदळी तुडवणेच आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक
सरकारी महाधिवक्ता तुषार मेहता यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, तलावामधील प्रदूषण न्यून करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. हे विसर्जन प्रतिकात्मक असेल. विसर्जन झाल्यानंतर विसर्जित मूर्ती त्वरित क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढल्या जातील. त्यानंतर त्यांना ठराविक स्थळी नेले जाणार आहे. (अशाप्रकारे मूर्ती हाताळल्या जाणे, हे हिंदूंच्या देवतांचे विडंबनच होय. सरकारने बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानांचा विचार करावा, असेच हिंदूंना वाटते. अशाप्रकारे देवतांच्या मूर्तींना हाताळावे का, याविषयी सरकारने हिंदूंचे शंकराचार्य आणि संत यांना विचारले आहे का, याविषयीही हिंदूंना उत्तर मिळायला हवे. – संपादक)