१२ वर्षांनंतर कोकण रेल्वेमार्गावरील हळवल पुलाच्या जोडरस्त्यांचे काम चालू होण्याची शक्यता
प्रशासकीय कामांसाठी आस्थापनाची नियुक्ती करण्याचा निर्णय
कणकवली – गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कोकण रेल्वेमार्गावरील तालुक्यातील हळवल उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांच्या कामासाठीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. भूसंपादन आणि तांत्रिक कामे करण्यासाठी सल्लागार आस्थापनाची (कन्सल्टन्सी एजन्सीची) नियुक्ती करण्यासाठी ५ कोटी ४० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. जोडरस्त्यांच्या कामासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच काम चालू करण्यासाठी आदेश मिळून कामास प्रारंभ होण्याची शक्यता आहे.
हळवल उड्डाणपूल दोन्ही बाजूंनी रस्त्यांनी जोडला न गेल्याने कणकवली ते हळवल, कसवण, तळवडे, शिवडाव, कळसुली आदी अनेक गावांतील प्रवाशांना रेल्वे वाहतूक चालू असल्यास हळवल रेल्वेफाटकावर अनेक घंटे थांबावे लागत आहे. आता १२ वर्षांनंतर उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांसाठी भूसंपादनासह सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आस्थापनाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची निविदा काढण्यात आली आहे. हळवल उड्डाणपूल जोडरस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया करण्यासह कागदपत्र सिद्ध करणे, रेल्वे खात्याची अनुमती घेणे, रस्त्याच्या उर्वरित कामाची रूपरेषा सिद्ध करणे आदी कामे या नियुक्त केल्या जाणार्या आस्थापनाच्या वतीने पूर्ण करण्यात येणार आहेत.
या पुलाला जोडरस्ते व्हावेत, यासाठी हळवल रेल्वेफाटक परिसरात वर्ष २००९ पासून आंदोलने करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारा अपुरा कर्मचारी आणि अधिकारी वर्ग यांमुळे काम संथगतीने होत होते. त्यामुळे या कामाला गती मिळण्यासाठी ‘कन्सल्टन्सी एजन्सी’ नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्ष २०११ मध्ये कोकण रेल्वेने उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर वर्ष २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात जोडरस्त्यांच्या भूसंपादनासाठी निधी संमत करण्यात आला. त्यानंतरच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात सल्लागार आस्थापनाच्या नेमणुकीसाठी ४० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली. येत्या २ दिवसांत सल्लागार आस्थापनाची निवड केल्यानंतर त्याला वरिष्ठ पातळीवर मान्यता देऊन प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.