६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा निपाणी, बेळगाव, कर्नाटक येथील कु. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी (वय ६ वर्षे) याच्या संदर्भातील श्री हालसिद्धनाथांच्या घोड्याविषयीची अनुभूती
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी एक आहे !
निपाणी, बेळगाव, कर्नाटक येथील कु. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी याचा आज भाद्रपद शुक्ल पक्ष एकादशी (१७ सप्टेंबर २०२१) या दिवशी सहावा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याचे वडील डॉ. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांना त्याच्या संदर्भातील आलेली अनुभूती येथे देत आहोत.
(‘वर्ष २०१९ मध्ये कु. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी याची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती.’ – संकलक)
चि. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी याला सहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. मार्ग चुकल्याने संत बाळूमामांच्या मंदिरात दर्शनाला जाण्याऐवजी मार्गातील आदमापूर गावातील संत बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेणे
‘२३.५.२०१९ या दिवशी मी, माझी पत्नी आणि मुलगा कु. विष्णु यांना घेऊन चारचाकीने मेटके गावातील संत बाळूमामांच्या मंदिरात दर्शनाला जायचे ठरवले. त्या वेळी आमच्या समवेत माझी मावस बहीण आणि तिची मुले होती. मेटके येथे जातांना मध्ये रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू असल्यामुळे मी या गावाकडे जाणारे डावे वळण घ्यायला विसरलो आणि पुष्कळ अंतर तसाच पुढे गेलो. रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यावर परत येण्याऐवजी आम्ही आदमापूर येथील संत बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे ठरवले. समाधीचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही मेटके येथे जाण्याचा विचार केला होता; पण त्या वेळी पुष्कळ उशीर झाला असल्याने आम्ही अप्पाचीवाडी (कुर्ली) येथील श्री हालसिद्धनाथांचे दर्शन घ्यायला गेलो.
२. अप्पाचीवाडी (कुर्ली) येथील श्री हालसिद्धनाथांचे दर्शन घेण्यास गेल्यावर कु. विष्णु क्षणभर श्री हालसिद्धनाथांप्रमाणे कुणाला तरी आशीर्वाद देत असलेल्या मुद्रेत उभा असलेला दिसणे
कु. विष्णु आणि त्याची आई प्रथमच अप्पाचीवाडी येथे आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यावर आम्ही सर्वजण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो. येथे सर्व भाविकांसाठी उदबत्ती आणि कापूर लावण्याची व्यवस्था आहे. काही कारणाने मी पुन्हा मंदिरात गेलो. माझ्या मावस बहिणीने मला हाक मारली अन् विष्णूकडे पहाण्यास सांगितले. ती मला म्हणाली, ‘‘काही वेळापूर्वी विष्णु क्षणभर श्री हालसिद्धनाथांप्रमाणे कुणाला तरी आशीर्वाद देत असलेल्या मुद्रेत उभा होता.’’ मी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा तो जळणारा कापूर आणि उदबत्त्या यांकडे एकटक पहात होता. मी माझ्या बहिणीचे हे वाक्य ऐकून पुष्कळ आश्चर्यचकित झालो. मी पुन्हा श्री हालसिद्धनाथांना प्रार्थना केली. माझी बहीणही विष्णूची ही स्थिती पाहून भारावून गेली होती.
३. श्री हालसिद्धनाथांच्या घोड्याला पाहून प्रथम कु. विष्णु घाबरणे
मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही श्री हालसिद्धनाथ पूर्वी रहात असलेल्या ‘श्री हालसिद्धनाथ वाड्या’कडे जाण्यास निघालो. या वेळीही मी रस्ता चुकलो आणि आम्ही श्री हालसिद्धनाथांच्या समाधी मंदिरात जाऊन पोचलो. तेथे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा वाड्याकडे आलो. या वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी एका लहानशा जागेत तारेचे कुंपण घालून श्री हालसिद्धनाथांचा घोडा ठेवला आहे. हा घोडा त्या जागेत हिंडत होता. त्याला पाहून विष्णु घाबरला. आम्ही वाड्यात जाऊन दर्शन घेतले आणि काही काळ नामजप करत तिथे बसलो.
४. वाड्याबाहेर पडतांना श्री हालसिद्धनाथांचा घोडा विष्णूलाच भेटायला येत असल्याचे तीव्रतेने जाणवणे, विष्णूने हालसिद्धनाथांचा जयघोष केल्यावर घोडा स्थिर उभा राहून विष्णुकडेच पहात असल्याचे जाणवणे
आम्ही वाड्यातून बाहेर पडतांना विष्णु माझ्या कडेवर होता. त्या वेळी कुंपणाच्या विरुद्ध दिशेला असलेला श्री हालसिद्धनाथांचा घोडा आमच्या दिशेने येत होता. ‘घोडा विष्णूलाच भेटायला येत आहे’, असे मला आतून तीव्रतेने जाणवले. आम्ही घोड्याच्या जवळ गेल्यावर मी विष्णूला ‘घोडा तुला भेटायला आला आहे’, असे सांगितले. ते ऐकून घाबरलेला विष्णु शांत आणि स्थिर झाला. घोडा विष्णूकडे पहात होता. मी विष्णूला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ आणि ‘हालसिद्धनाथांच्या नावाने चांगभलं’ असे म्हणण्यास सांगितले. विष्णूने तसे म्हटल्यावर घोडा स्थिर उभा राहिला. आम्ही तेथे काही क्षण उभे होतो. त्या कालावधीत घोडा आमच्याकडे एकटक पहात होता. आम्ही वाड्यातून बाहेर पडतांना तो घोडा स्थिर उभा राहून आमच्याकडे पहात होता. आम्ही तेथून बाहेर पडल्यावरही घोडा विष्णूकडेच पहात होता.
५. हा प्रसंग म्हणजे श्री हालसिद्धनाथ यांचेच दैवी नियोजन असल्याचे जाणवणे
या अनुभूतीमुळे मी पुष्कळ भारावून गेलो. वरील संपूर्ण प्रसंग म्हणजे दैवी नियोजनाचा भाग असल्याचे मला जाणवत होते. मला पुष्कळ शांत आणि स्थिर वाटत होते. आम्ही कोणत्याही पूर्वनियोजनाविना आदमापूर आणि श्री हालसिद्धनाथ येथे जाऊन आलो. ‘श्री हालसिद्धनाथ यांचे हे नियोजन होते’, असे मला वाटले. आमच्यावर कृपेचा वर्षाव करणार्या श्रीकृष्ण, श्री हालसिद्धनाथ आणि श्री बाळूमामा यांच्या चरणी मी कृतज्ञ आहे. ‘साधनेच्या या सुंदर प्रवासात त्यांची कृपादृष्टी आमच्यावर अशीच रहावी’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी, निपाणी, बेळगाव. (३.६.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |