निरासक्त, प्रेमळ आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ असलेल्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७८ वर्षे) !
‘माझ्या साधनेच्या आरंभीच्या काळात मला अनेक साधकांचा प्रीतीमय सहवास लाभला. त्यात अग्रस्थानी असलेल्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू मला अतिशय जवळच्या आहेत. त्या संतपदी विराजमान होण्याची मी वाट पहात होते. तो दिवस उगवला आणि जुन्या स्मृतींना उजाळा मिळून त्या प्रीतीमय स्मृती मनःपटलावर तरळून गेल्या.
१. पू. कोरेकाकूंशी झालेला परिचय आणि त्यांच्याविषयी वाटणारी आदरयुक्त भीती !
जानेवारी २००० मध्ये मी पूर्णवेळ साधना चालू केल्यानंतर मिरज (जि. सांगली) येथील कोरे ‘हॉस्पिटल’मध्ये चालू केलेल्या सनातनच्या सेवाकेंद्रात सेवेसाठी जाऊ लागले. हे कोरे ‘हॉस्पिटल’ पू. कोरेकाकूंचे होते आणि त्या सर्वांत वरच्या माळ्यावर रहात होत्या. त्यांच्याच घरातील काही खोल्यांमध्ये आम्ही ३ – ४ साधिका रहात होतो. तेव्हा काकू घरी एकट्याच रहात होत्या. आरंभी माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती. नंतर माझ्या नकळत त्यांनीच ती आदरयुक्त भीती दूर केली.
२. स्वयंशिस्त
पू. कोरेकाकू घराची ज्या पद्धतीने देखभाल करत, त्यातून त्यांची स्वयंशिस्त दिसून येत असे. त्यांच्या घरातील सर्व वस्तू नीटनेटकेपणाने ठेवलेल्या असत. त्या घराची स्वच्छता स्वतः नियमितपणे करत असत.
३. नियोजनबद्धता
पू. काकूंची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी उठल्यापासून त्यांची प्रत्येक कृती नियोजनबद्ध असे. त्या अजूनही नियोजनबद्ध जीवन जगतात.
४. शालीनता
त्या वेळी त्या प्रसाराची सेवा करत. ‘विज्ञापने मिळवणे, अर्पण गोळा करणे’ आदी सेवा करतांना त्यांच्या वागण्यात कुठेही उच्चशिक्षित किंवा उच्च घराण्यातील असल्याचा मोठेपणा नसायचा. त्यांच्यातील शालीनता मोहून टाकणारी होती.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव
परात्पर गुरु डॉ. आठवले मिरज येथे आल्यावर पू. काकूंच्या घरी यायचे. ते आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांसाठी नामजपादी उपायही सांगायचे. त्या वेळी पू. काकू परात्पर गुरु डॉक्टरांच्या निवासाची उत्तम व्यवस्था ठेवत. पू. काकूंमुळे मला तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांना जवळून अनुभवता आले.
६. निरासक्त
पू. काकूंनी त्यांचे सर्वस्व गुरुचरणी अर्पण केले आहे. मागील काही वर्षांपासून ‘त्या केवळ साधनेसाठी निमित्तमात्र जीवन जगत आहेत. आता त्यांना कशाचीच आसक्ती नाही’, असे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून मला जाणवत होते.
७. पू. काकू मला त्यांच्या समवेत विज्ञापने आणण्यासाठी घेऊन जात. त्या जिज्ञासूंना गुरुकार्य अतिशय तळमळीने सांगत.
८. साधनेने स्वतःत लक्षणीय पालट घडवून आणणे
पू. काकूंनी तीव्र साधना करून स्वतःत लक्षणीय पालट घडवून आणला आहे. माझ्या साधनेच्या आरंभीच्या काळात मी पाहिलेल्या काकू आणि आताच्या पू. काकू यांत पुष्कळ भेद आहे.
मी आरंभापासून त्यांचे प्रेमच अनुभवले असल्याने त्या मला माझ्या आईहून जवळच्या वाटतात. पू. कोरेकाकूंना घडवणार्या परात्पर गुरुमाऊलींच्या आणि पू. काकूंच्या चरणी कृतज्ञतापूर्वक प्रणाम !’
– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |