१.७.२०२० या दिवशी पू. वामन राजंदेकर यांच्या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. पू. वामन शांत, गंभीर आणि स्थिर असतांना ते ‘ध्यानावस्थेत आहेत अन् सूक्ष्मातील युद्ध चालू असून ते निर्गुणावस्थेतून लढत आहेत’, असे जाणवणे
‘१.७.२०२० या दिवशी दुपारपासून (साधारण दुपारी १२.०० नंतर) पू. वामन एकदम शांत, गंभीर आणि स्थिर झाले होते. हे बघत असतांना ‘त्यांची दृष्टी स्थुलातील गोष्टी बघत नसून लांब कुठेतरी स्थिरावली आहे’, असे मला जाणवत होते. याच स्थितीत अदमासे १.१५ वाजता ते झोपले (तशी ही त्यांच्या झोपेची वेळ नाही) ते ४.०० वाजेपर्यंत झोपले होते. त्या वेळी ‘ते ध्यानावस्थेत आहेत आणि सूक्ष्मातील युद्ध चालू असून ते निर्गुणावस्थेतून लढत आहेत,’ असे जाणवले. ४.०० वाजता उठल्यानंतरही ते गंभीर आणि स्थिर होते. ते जरासुद्धा हसत नव्हते. (नंतर बर्याच साधकांकडून समजले, ‘आज आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढली आहे.’)
२. पू. वामन ‘सद्गुरु मुकुल गाडगीळकाका यांच्या खोलीत चैतन्य आणि शक्ती ग्रहण करण्यासाठी गेले आहेत’, असे जाणवणे
संध्याकाळी ५ वाजता मी आणि पू. वामन सद्गुरु गाडगीळकाकांच्या खोलीत गेलो. पू. वामन यांनी स्वतःच त्यांच्या खोलीचे दार वाजवले आणि उघडले. आत गेल्यावर त्यांनी सद्गुरु काकांचे उपायांचे खोके काढून मागितले. ते दिल्यावर पू. वामन बराच वेळ त्यांच्याशी (खोक्यांशी) खाली फरशीवर बसून खेळत होते. ते खेळतांना साधारण ४ – ५ घंट्यांनी पू. वामन हसायला लागले आणि आनंदी दिसले. त्या वेळी असे जाणवले, ‘पू. वामन सद्गुरु गाडगीळकाकांच्या खोलीत चैतन्य आणि शक्ती ग्रहण करण्यासाठीच गेले होते; कारण काही वेळाने ते आनंदी होऊन स्वतःच खोलीच्या बाहेर आले.’
३. पू. वामन यांनी बालसाधकांना श्री सिद्धिविनायक मंदिराकडे घेऊन जाणे आणि कलशावर असलेल्या भगव्या ध्वजाकडे पाहून ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’ म्हणण्यास सांगणे
१.७.२०२० या दिवशी संध्याकाळी ६ वाजता पू. वामन आश्रमातील स्वागतकक्षाजवळ खेळत होते. तितक्यात बालसाधकांचे स्तोत्रपठण संपले आणि सगळे बालसाधक सभागृहातून बाहेर आले. सर्व जण पू. वामन यांना बघून त्यांच्याशी बोलायला जवळ आले. तेव्हा ते बालसाधकांना घेऊन बाहेर आश्रमाच्या प्रवेशद्वारा जवळ ‘श्री सिद्धिविनायक’ आणि ‘श्री भवानीदेवी’ यांच्या मंदिरांसमोर गेले. त्या वेळी सर्वांना वाटले, ‘पू. वामन श्री सिद्धिविनायकाला नमस्कार करायला सांगत आहेत; परंतु पू. वामन सर्वांना मंदिरावरील कलशाजवळ असलेल्या भगव्या ध्वजाकडे बघायला सांगून ‘हे ए हे ए’ म्हणत हात उंचावून ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’, अशी घोषणा देण्यास सांगत होते. बालसाधकांनी हळू आवाजात अशी घोषणा दिल्यावर पू. वामन यांना पुष्कळ आनंद झाला. ते आनंदाने आणि कौतुकाने सर्वांकडे बघत होते.’
– सौ. मानसी राजंदेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.७.२०२०)
|