सैन्याचे सक्षमीकरण !
संपादकीय
|
केंद्रात राष्ट्रप्रेमी भाजपचे शासन आल्यानंतर सैन्यदलात सकारात्मक पालट होत आहेत. खरेतर सैन्य हा कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा कणा असतो. त्याच्या सक्षमीकरणावर देशाची सुरक्षितता अवलंबून असते. भारतियांसाठी तर सैनिक हे केवळ शस्त्रधारी नसून ते भारतियांचे मानबिंदू आहेत. प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियाचे प्रत्येक सैनिकाशी आदराचे आणि हृद्य नाते आहे. असे असतांना गेली अनेक दशके सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने मात्र सैन्यदलाची घोर उपेक्षा केली. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांअभावी कित्येक भारतीय सैनिकांना हुतात्मा व्हावे लागले. आतंकवाद आणि पाकिस्तान यांच्या संदर्भात काँग्रेस सरकारच्या असलेल्या कचखाऊ धोरणांमुळे कित्येक सैनिक नाहक हुतात्मा झाले. काँग्रेसने केलेल्या घोडचुका सध्याच्या राष्ट्रप्रेमी शासनाच्या काळात सुधारल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहली येथे संरक्षण खात्याच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. ‘देशाच्या राजधानीत वसणारे संरक्षण खात्याचे कार्यालय अत्याधुनिक सुविधांसह सैन्यदलात प्रभावी कार्य करील’, असा आशावाद पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. ‘भारतीय सैन्यासाठी आधुनिक शस्त्रात्रांची उपलब्धता करून दिली जात असतांना संरक्षणविषयक कामकाज जुन्या आणि सुविधांसंदर्भात मर्यादा असणार्या कार्यालयांत कसे होऊ द्यायचे ?’, असा प्रश्न निर्माण करून पंतप्रधानांनी त्याला कृतीशील उत्तरही दिले आहे. पंतप्रधानांचा हा निर्णय राष्ट्रप्रेमी नागरिकांना सुखावणारा आहे, किंबहुना त्यांनी घेतलेल्या निर्णयामागील विचारधारा राष्ट्रप्रेमींसाठी आशादायक आहे.
राष्ट्रप्रेमी निर्णयांचे वारे !
सत्ता मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सैन्य दलासंदर्भात हितकारी निर्णय घेतले. चीनला लागून असणार्या सीमांवर विविध प्रकारची शस्त्रे, सामुग्री, बोटी, सैन्य पुरवणे असो वा आतंकवाद्यांना ‘सर्जिकल स्ट्राईक’ किंवा ‘एअर स्ट्राईक’ यांद्वारे दिलेले चोख उत्तर असो, सैन्याच्या संदर्भात केंद्रातील विद्यमान सरकारने संवेदनशील आणि सजग भूमिका घेतली. पूर्वी भारतात एखाद्या शस्त्रावर संशोधन करून ते यशस्वीपणे सैन्यात समाविष्ट करेपर्यंत २५ ते ३० वर्षे निघून जायची. भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ विमानाला २५ ते ३० वर्षे लागली. ‘अर्जुन’ रणगाडा सिद्ध करायला भारताला ५० वर्षे लागली. ‘अरिहंत’ नावाची पाणबुडी (सबमरिन) बनवणे, हे तर ३० ते ३५ वर्षांपासून चालू आहे. जग नवीन संशोधनाकडे वळायचे, तेव्हा आपण आणलेले शस्त्र पूर्णत: जुने झालेले असायचे. गेल्या काही मासांमध्ये मात्र या गतीत सकारात्मक पालट होत आहेत. भारताने मागील ५-६ मासांमध्ये क्षेपणास्त्रांच्या ४० हून अधिक चाचण्या केल्या आहेत. ‘ड्रोन’चाही भारतीय सैन्यात समावेश केला आहे. या सर्वांची गतीही पुष्कळ वाढलेली आहे. शस्त्रखरेदी आदींसाठी शासनाकडून भरीव आर्थिक तरतूद करण्यात येत आहे. अशा प्रकारे भारतीय सैन्याची घोडदौड चालू आहे.
पल्ला दूरचा आहे !
भारतीय सैन्याकडे असलेली अनमोल गोष्ट म्हणजे सैनिकांची समर्पण वृत्ती ! काँग्रेसच्या लांगूलचालनाच्या स्वार्थांध आणि गलिच्छ राजकारणातही देशाच्या सैनिकांनी देशाचे डोळ्यांत तेल घालून रक्षण केले, हे त्यांच्यातील वीरवृत्ती आणि राष्ट्रप्रेमाच्या अनन्य भावनेमुळेच शक्य झाले. हा सैनिकी बाणा भारताची अमूल्य संपदा आहे. आज दुर्दैवाने या बाण्याला धक्का लागत आहे. गेल्या ७ वर्षांत ८०० सैनिकांनी आत्महत्या केल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत दिली आहे. ‘युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’च्या (‘यू.एस्.आय.’च्या) एका अभ्यासातून सैनिकांविषयी धक्कादायक माहिती समोर आली. ‘भारतीय सैन्य आतंकवादी आक्रमण किंवा पाकच्या गोळीबारात जितके सैनिक गमावत नाही, तितके सैनिक तणावामुळे गमावत आहे. अनेक सैनिक आणि अधिकारी उच्च रक्तदाब, मनोविकार, न्यूरोसिस आदी व्याधींनीही ग्रस्त आहेत’, अशी माहिती या अभ्यासातून समोर आली आहे. ही माहिती चिंताजनक आहे. सैनिकांच्या मनावर ताणाचे ओझे साचत जाण्यामागील कारणांचा प्रथम शोध घ्यायला हवा. सीमेवरील परिस्थिती ही अत्यंत प्रतिकूल असते. अशा प्रतिकूल परिस्थितीत मनोधैर्याचा कस लागतो. प्रबळ इच्छाशक्ती आणि राष्ट्रभक्ती हे मनोधैर्य जिवंत ठेवत असते. यासह तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जाण्याचे प्रशिक्षणही मनोधैर्य टिकण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी सुनियोजित पद्धतीने देशाची शिक्षणप्रणाली पालटली. विद्यार्थ्याला आत्मबळ पुरवणारा शिक्षणस्रोत नष्ट केल्याने त्याचे पडसाद वेगवेगळ्या क्षेत्रांसह सैन्यातही दिसून येत आहेत. धर्माधारित शिक्षणातून व्यक्ती सर्वार्थाने सक्षम होते. नुकतेच तेलंगाणा येथील ‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’कडून सैन्याधिकार्यांना ‘श्रीमद्भगवद्गीता’ आणि ‘कौटिल्य अर्थशास्त्र’ शिकवण्याची शिफारस करण्यात आली आहे. खरेतर सैन्याच्या अभ्यासक्रमात सर्वच हिंदु ग्रंथातील ज्ञान समाविष्ट करायला हवे. मनाला वज्रासम कठोर आणि निश्चल ठेवण्याचे मार्ग या ग्रंथांत आहेत. यांसह अनेक गुणांसंदर्भातील ज्ञानगंगा, युद्धतंत्राविषयी अनुभवजन्य माहिती या ग्रंथांत आहे. त्यामुळे सैनिकांना धर्मशिक्षण देणे, हे त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हितावह आहे. अर्थात् जे उदात्त अन् उन्नत असते, त्याला विरोधाला तोंड द्यावेच लागते. त्याप्रमाणे सैन्याच्या अभ्यासक्रमात हिंदूंचे ग्रंथ समाविष्ट करण्यास तथाकथित निधर्मीवाद्यांनी विरोध केला. हा राष्ट्रघातकी विरोध मोडून काढायला हवा. यासह भारतीय सैन्यात अजूनही जुन्या आणि विदेशी बनावटीची सामुग्री आहे. उडत्या शवपेट्या असलेली विमाने सैनिकांच्या हौतात्म्यास कारणीभूत ठरत आहेत. पाकिस्तान आणि चीनसारख्या शत्रूराष्ट्रांच्या संदर्भातील नरमाईची धोरणे, दगडफेकी फुटीरतावाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात केली जाणारी दिरंगाई यांमुळे भारतीय सैनिकांच्या श्रमाचा अपव्यय होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने कृतीशीलतेची गती वाढवायला हवी. सैन्याच्या सक्षमीकरणाकरता सरकारने घेतलेल्या प्रत्येक धाडसी निर्णयाला राष्ट्रप्रेमी जनतेचे समर्थनच असेल !