अन्नदात्या शेतकर्यांचा आक्रोश !
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टी अन् महापूर यांमुळे अन्नदाता शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, वस्त्रोद्योग व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, कामगार, शेतमजूर आदींची मोठी आर्थिक हानी झाली आहे. कोरोनामुळे बाजार समित्या, आठवड्याचा बाजार, वाहतूक आदी सर्व बंद असल्यामुळे शेतीमालाचीही मोठी हानी झाली. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी निराशेत जाऊन शेतीमाल रस्त्यावर फेकून देत आहेत. सर्वच क्षेत्रांतील अनिश्चिततेमुळे शेतकर्याने कष्ट करून पिकवलेल्या शेतीमालाला किंमत मिळेनाशी झाली आहे. एकूणच सर्व समस्यांमुळे त्रस्त झालेले पूरग्रस्त आणि शेतकरी यांनी नुकतीच प्रयाग चिखली (जिल्हा कोल्हापूर) ते नृसिंहवाडी (जिल्हा सांगली) अशी ‘आक्रोश पदयात्रा’ काढली.
वर्ष २०१९ मध्येही असाच पुराचा फटका सांगली आणि कोल्हापूरवासियांना बसला होता. वर्ष २००५ ते २०२१ या १६ वर्षांमध्ये अनेक वेळा पुरामुळे पुणे-बेंगळुरू हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याची वेळ आली. यामुळे शेतमाल पुणे, मुंबई या ठिकाणी पोचू न शकल्यामुळे परिणामी मोठी हानी झाली. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अजूनही राष्ट्रीय महामार्गांसारख्या मूलभूत सुविधांसाठी शेतकर्यांना आक्रोश करावा लागणे, हे दुर्दैवी ! याची योग्य पातळीवर नोंद घेऊन उपाययोजना काढली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळ भराव अल्प करून तातडीने कमानी पूल बांधण्याची आवश्यकता आहे. पुरामध्ये सर्वस्व गमावलेले पूरग्रस्त आणि शेतकरी यांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. ते होण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्रतिवर्षी पुरामुळे उद्ध्वस्त होणार्या नदीकाठच्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे कि मानवनिर्मित याचेही संशोधन झाले पाहिजे. मानवी चुका, ढिसाळ नियोजन यांमुळे राष्ट्रीय संपत्तीचीही प्रचंड हानी होते आणि ती भरून काढण्यासाठी सरकारला तिजोरी रिकामी करावी लागते. यामुळे शेतीचा अंतर्भाव असणार्या पूरग्रस्त भागांची पहाणी करण्यासाठी शासनाने त्वरित एक अभ्यासगट नेमून त्यांच्याकडून अहवाल मागवून घ्यावा आणि त्यानुसार कारवाई करावी, तरच अन्नदात्या शेतकर्यांच्या समस्या अल्प होतील. – श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा