ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याप्रकरणी भाजपच्या वतीने पनवेल येथे राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन !
पनवेल – ओबीसीचे आरक्षण गेल्याप्रकरणी राज्य सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने १५ सप्टेंबर या दिवशी पनवेल तालुका आणि शहर भाजप कार्यालयाजवळ ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनखाली हे आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी नेहमीच उदासीनता दाखवून समाजाचा नेहमीच विश्वासघात केला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला न्यायापासून वंचित ठेवणार्या राज्य सरकारच्या विरोधात येथे निदर्शने करत आहोत, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, ‘ओबीसी सेल’चे प्रदेश उपाध्यक्ष मनोज भुजबळ, ‘ओबीसी मोर्चा’चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घरत आदी मान्यवर उपस्थित होते.