साकीनाका बलात्कार प्रकरण खटल्यातील अधिवक्ता पालटण्याची पीडितेच्या आईची मागणी !
मुंबई – साकीनाका येथील महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या खटल्यातील विशेष सरकारी अधिवक्ता पालटण्यात यावा, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे. या संदर्भात आईने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पत्र पाठवले आहे.
पीडितेच्या आईने पत्रात म्हटले आहे की, ५ वर्षापूर्वी जे.जे. रुग्णालयाच्या आधुनिक वैद्या पायल तडवी यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी राजा ठाकरे यांनी काम पाहिले होते. ठाकरे यांच्या हलगर्जीपणामुळे तडवी यांच्या गुन्ह्यातील आरोपी आधुनिक वैद्यांना जामीन मिळाला होता, असा आरोप केला आहे. ठाकरे यांच्या जागी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक संदर्भातले खटले चालवण्याचा अनुभव असणारे अधिवक्ता नितीन सातपुते यांची सरकारी अधिवक्ता म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.