आपल्या प्रीतीमय वागण्याने प्राणी आणि पक्षी यांनाही आकर्षून घेणारे अन् सुंदर बाललीलांनी सर्वांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

आज ‘वामन जयंती’ (१७.९.२०२१) या दिवशी सनातनचे दूसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा तिथीनुसार तिसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची आई सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर यांनी पू. वामन यांच्यातील संतत्व दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण सूत्र पुढे दिली आहेत.

(भाग १)

सनातनचे दुसरे बालक संत पू. वामन राजंदेकर यांना तिसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !

१. नागपूर येथे विमानातून खाली उतरतांना हवाईसुंदरीने ‘बाय’, ‘बाय’ केल्यावर पू. वामन यांनी हसून, दोन्ही हात जोडून ‘नमस्कार’, करणे अन् हवाईसुंदरीने पू. वामन यांची क्षमा मागून नंतर येणार्‍या प्रवाशांना ‘नमस्कार’ करणे

‘जानेवारी २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात आम्ही पुण्याहून नागपूरला विमानाने गेलो होतो. नागपूर येथे पोचल्यावर विमानातून बाहेर येतांना तेथील हवाईसुंदरी सर्वांना ‘बाय’, ‘बाय’, असे म्हणत होत्या. त्यांनी पू. वामन (वय ३ वर्षे ) आणि कु. श्रिया (पू. वामन यांची मोठी बहीण, वय १० वर्षे आणि आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनाही ‘बाय’, ‘बाय’ म्हटले. त्या वेळी पू. वामन यांनी हसून आणि दोन्ही हात जोडून त्यांना ‘नमस्कार’, असे म्हटले. त्यावर त्यातील एका हवाईसुंदरीने पू. वामन यांची क्षमा मागितली आणि म्हणाली, ‘‘मीसुद्धा आता ‘नमस्कार’ असेच म्हणते.’’

आम्ही चालत पुढे निघालो. तेव्हा पू. वामन माझ्या कडेवरून मागे वळून हवाईसुंदरीकडे बघत होते. ते म्हणाले, ‘‘ती ताई (हवाईसुंदरी) ‘नमस्कार’, असे म्हणत आहे.’’ असे म्हणून ते स्मितहास्य करू लागले. नंतर विमानातून बाहेर येणार्‍या सर्व प्रवाशांना त्या दोन्ही हवाईसुंदरींनी हात जोडून नमस्कार केला. त्या वेळी मला पुष्कळ आश्चर्य आणि कृतज्ञता वाटली की, पू. वामन इतके लहान असूनही अनोळखी व्यक्तींनी लगेचच त्यांचे अनुकरण केले. त्या वेळी संतांच्या वाणीतील चैतन्य आणि सामर्थ्य यांमुळे होणार्‍या परिणामांची मला जाणीव झाली अन् मी मनोमन परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

२. पू. वामन यांच्या भेटीसाठी आतुरलेले प्राणी-पक्षी आणि पू. वामन यांची त्यांच्यावर असलेली प्रीती !

२ अ. नागपूरला परिचित व्यक्तीकडे गेल्यावर त्यांच्याकडील कुत्रा पू. वामन यांच्या जवळ येऊन बसणे आणि पू. वामन यांनी दिलेले चॉकलेट त्या कुत्र्याने पूर्ण खाणे : नागपूर येथे असतांना आम्ही एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरी एक पाळीव कुत्रा होता. पू. वामन यांना बघून तो कुत्रा त्यांच्या जवळ येऊन बसला. काही वेळाने पू. वामन मला म्हणाले, ‘‘आई नारायणबाबांनी दिलेले चॉकलेट दे ना !’’ (‘नारायणबाबा’ म्हणजे प.पू. दास महाराज) मी त्यांना चॉकलेट दिल्यावर त्यांनी ते चॉकलेट कुत्र्याला दिले आणि कुत्र्यानेही ते पूर्ण चॉकलेट खाल्ले. नंतर मी कुत्र्याविषयी त्यांच्या घरातील व्यक्तींना विचारले असता मला समजले, ‘त्या कुत्र्याला प्रभु श्रीराम आणि श्रीरामाची आरती पुष्कळ आवडते. घरात आरतीच्या वेळी तो कुत्रा आरतीला येतो आणि प्रसादही घेतो. ‘तो कुत्रा सात्त्विक आहे आणि त्यामुळेच पू. वामन यांनी त्याला प्रसादाचे चॉकलेट दिले असावे’, असे मला वाटले.

२ आ. नागपूरला एका वैद्यांच्या घरी गेल्यावर पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज येणे आणि पक्ष्यांची भाषा कळल्याने वैद्यांनी दोन्ही पक्ष्यांचे पिंजरे बाहेर आणून पू. वामन यांच्या शेजारी ठेवल्यावर ते शांत होऊन त्यांनी पू. वामन यांच्याकडे एकटक पहाणे : नागपूरला आम्ही एका वैद्यांकडे गेलो होतो. तेव्हा त्यांच्या घरातून पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. तो आवाज थांबत नव्हता; म्हणून त्या वैद्या घरात जाऊन दोन्ही पक्ष्यांना त्यांच्या पिंजर्‍यांसह बाहेर घेऊन आल्या. त्या म्हणाल्या, ‘‘या दोघांना वामन यांना भेटायचे होते; म्हणून ते ओरडत होते.’’ वैद्यांना त्यांच्या पक्ष्यांची भाषा कळते. त्यामुळे त्यांनी ते दोन्ही पिंजरे पू. वामन यांच्या शेजारी ठेवले. तेव्हा ते पक्षी शांत झाले आणि पिंजर्‍यातूनच पू. वामन यांच्याकडे एकटक बघत राहिले. वैद्यांनी पक्ष्यांना विचारले, ‘तुम्हाला या वामनदादांना भेटायचे होते का ? आता छान वाटले ना तुम्हाला ! वामनदादा किती छान आहेत ना !’ त्यावर ते पक्षी अगदी गोड आवाज करून प्रतिसाद देत होते. काही वेळ ते पू. वामन यांच्या दिशेने पाहून मान खाली करत होते. तेव्हा ‘ते पू. वामन यांना नमस्कार करत आहेत’, असे मला आणि त्या वैद्यांना जाणवले. हे सर्व बघतांना पू. वामन अगदी शांत आणि स्थिर बसले होते. यावरून ‘पक्ष्यांनाही संतांच्या अस्तित्वाची जाणीव होते’, हे लक्षात आले.

२ इ. पू. वामन यांच्या भेटीसाठी प्रतिदिन घराच्या आगाशीत किंवा खिडकीत येणारे कावळा, चिमणी आणि बुलबुल ! : फोंडा, गोवा येथील आमच्या घराजवळच्या झाडांवर बरेच पक्षी येतात. पू. वामन घराबाहेर येईपर्यंत कावळा, चिमणी किंवा बुलबुल असे अनेक पक्षी प्रतिदिन आमच्या घराच्या आगाशीत किंवा कधी खिडकीत येऊन बसतात. ते अखंड आवाज करत असतात. विशेष म्हणजे त्या वेळी कावळा नेहमीप्रमाणे न ओरडता एक वेगळ्या प्रकारचा आवाज करतो. चिमणी आणि बुलबुल हे पक्षी तर त्यांच्या गोड आवाजाने पू. वामन यांना जणू बोलवत असतात. त्यांचा आवाज ऐकून पू. वामन म्हणतात, ‘हो. आलो आलो’ आणि ते त्या पक्ष्यांना बघायला जातात. तेव्हा पू. वामन यांची वाट पहात असल्याप्रमाणे ते पक्षी त्यांच्याकडे वाकून बघतात आणि नंतर उडून जातात. पू. वामन यांच्या झोपेच्या वेळी जणू अगदी सांगितल्याप्रमाणे एकही पक्षी आवाज करत नाही.

२ ई. घराजवळील झाडांवर वानरे येणे, ती येण्यापूर्वी पू. वामन यांनी ‘वानरे येणार आहेत’, असे सांगणे आणि त्यांनी वानरांना ‘आता तुमच्या घरी जा’, असे सांगितल्यावर ती निघून जाणे : गोव्यातील आमच्या घराजवळील झाडांवर काही वानरे येतात. बर्‍याचदा ‘वानरे येणार आहेत’, हे पू. वामन आधीच सांगतात अन् खरोखर काही वेळातच पुष्कळ वानरे येतात. पू. वामन शांतपणे त्या वानरांकडे बघतात आणि ‘तुमचे ‘मंमं’ (खाणे) झाले असेल, तर आता तुमच्या घरी जा’, असे त्यांना सांगतात. ‘त्यांनी असे सांगितल्यावर वानर काही वेळातच परत जातात’, असे लक्षात आले.

३. पू. वामन यांची सूक्ष्मातून वातावरण जाणण्याची क्षमता

अ. कधी कधी बाहेर पुष्कळ ऊन असते. आकाशात कुठेच ढग दिसत नसतात; पण पू. वामन आकाशाकडे बघत म्हणतात, ‘‘आज पुष्कळ जोरात पाऊस येणार आहे.’’ त्या वेळी अकस्मात् काही वेळातच ढग येऊन अंधारून येते आणि जोराचा पाऊस पडतो. असे बर्‍याच वेळा झाले आहे.

आ. कधी बाहेर कडक ऊन पडलेले असतांना पू. वामन त्यांच्या बाबांना म्हणतात, ‘‘आता दुचाकी गाडीने बाहेर जाऊ नका. चारचाकी गाडीने जा; कारण धो धो पाऊस पडणार आहे.’’ प्रत्यक्षातही काही वेळात अकस्मात् वातावरणात पालट होऊन पाऊस पडतो.

इ. काही वेळा पाऊस पडत असतांना ते म्हणतात, ‘‘सूर्यबाप्पा आले आहेत. आता पुष्कळ उकडणार.’’ काही वेळाने तसेच घडते.

४. प्रत्येक गुरुवारी होणार्‍या भाववृद्धी सत्संगाविषयी पू. वामन यांचा भाव !

४ अ. भाववृद्धी सत्संगाची दुपारची वेळ ही झोपेची वेळ असूनही न झोपता नियमित सत्संग ऐकणारे पू. वामन ! : पू. वामन प्रत्येक गुरुवारी दुपारी होणारा भाववृद्धी सत्संग नियमित ऐकतात. हा सत्संग श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेतात. खरेतर ही त्यांची झोपण्याची वेळ असते; परंतु केवळ गुरुवारी ते दुपारी झोपत नाहीत. याविषयी त्यांना कुणी सांगितले अथवा शिकवले नाही. एखाद्या गुरुवारी काही कारणाने भाववृद्धी सत्संग नसेल, तर ते स्वतःहून विचारतात, ‘‘आज भावसत्संग का नाही ?’’

४ आ. सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा आवाज ऐकल्यावर पू. वामन यांनी आनंदाने संगणकाच्या ‘स्क्रीन’समोर (पडद्यासमोर) जाऊन साष्टांग नमस्कार करणे : भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा आवाज ऐकताच क्षणी ते ‘सद्गुरु मावशींचा आवाज’, असे म्हणून आनंदी होतात आणि लगेचच संगणकाच्या ‘स्क्रीन’समोर (पडद्यासमोर) जाऊन साष्टांग नमस्कार करतात. त्या सांगत असलेल्या प्रत्येक शब्दाकडे त्यांचे लक्ष असते. यावरून ‘संतांनाही साक्षात् श्री महालक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे चैतन्य ग्रहण करण्याची, तसेच त्यांच्या दैवी आवाजातील प्रीती अन् आनंद अनुभवण्याची ओढ असते’, हे लक्षात येते.

४ इ. संगणकावर देवतांचे चित्र किंवा परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवल्यास पू. वामन यांनी ‘स्क्रीन’समोर जाऊन तीन वेळा साष्टांग नमस्कार करणे आणि त्या वेळी त्यांना पुष्कळ आनंद होणे : भाववृद्धी सत्संगात जेव्हा देवतांचे चित्र किंवा परात्पर गुरु डॉक्टर आणि अन्य संत यांचे छायाचित्र दाखवले जाते, तेव्हा प्रत्येक वेळी पू. वामन संगणकाच्या ‘स्क्रीन’समोर जाऊन तीन वेळा साष्टांग नमस्कार करतात. ते आम्हालाही वाकून नमस्कार करायला सांगतात. परात्पर गुरुदेवांना आणि श्रीविष्णूला बघतांना त्यांना पुष्कळ आनंद होत असतो. जणू काही ‘ते त्यांना प्रत्यक्ष बघत आहेत’, असे वाटते.

४ ई. पू. वामन यांनी भावसत्संगात लावलेली भावगीते, भजने आदी समरस होऊन ऐकणे : भावसत्संगात जेव्हा भावगीते, भजने किंवा स्तोत्रे लावली जातात, तेव्हा पू. वामन ती पूर्ण एकाग्रतेने ऐकतात. काही वेळेला ते स्वतः म्हणण्याचा प्रयत्न करतात, तर कधी त्यावर आनंदाने डोलतात.

४ उ. भावसत्संग ऐकतांना काही वेळा पू. वामन यांना झोप यायला लागते. तेव्हा ते उभे राहून हळू आवाजात वेगवेगळे नामजप किंवा श्लोक म्हणतात. त्यामुळे त्यांना झोप येत नाही.

५. घरात स्वभावदोष निर्मूलनाच्या अंतर्गत होणार्‍या चुकांच्या सत्संगात स्वतःच्या चुका सांगून त्यासाठी क्षमा मागणारे पू. वामन !

५ अ. घरी प्रतिदिन रात्री स्वभावदोष निर्मूलनाच्या अंतर्गत चुकांचा सत्संग असणे : आम्ही घरी प्रतिदिन रात्री स्वभावदोष निर्मूलनाच्या अंतर्गत चुकांचा सत्संग घेतो. या सत्संगात आम्ही तिघेही (मी, श्री. अनिरुद्ध (पू. वामन यांचे वडील, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि कु. श्रिया) ‘स्वतःच्या चुका सांगणे, त्यामागील स्वभावदोष किंवा अहंचा पैलू सांगणे, तसेच काय सुधारणा करणार ? योग्य कृती किंवा विचार काय असायला पाहिजे ?’, यांविषयी सांगतो.

५ आ. पू. वामन यांनी सत्संगाचे निरीक्षण करून आपण होऊन स्वतःच्या चुका सांगणे : आरंभीचे २ दिवस पू. वामन यांनी आमच्या या सत्संगाचे निरीक्षण केले आणि तिसर्‍या दिवसापासून ते स्वतःच्या चुका सांगू लागले. ते त्यांचा क्रम आल्यावर आम्हाला विचारून त्यांच्या चुका सांगतात. ते स्वतःहून ‘मी मोठ्याने बोललो, आईचे ऐकले नाही किंवा हट्ट केला’, अशा चुका सांगतात. ‘या सर्व कृती चुकीच्या आहेत’, हे आम्ही कुणीही त्यांना सांगितलेले नसते. त्यांनी निरीक्षणातून स्वतः ते शिकून घेतले आहे.

५ इ. चुका सांगून झाल्यावर पू. वामन यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची क्षमायाचना करणे : चुका सांगून झाल्यावर ते स्वतःचे कान पकडून परात्पर गुरु डॉक्टरांची क्षमायाचना करतात. क्षमायाचना करतांना ‘मी आता परत असे करणार नाही – नाही – नाही’, असे म्हणतात आणि परात्पर गुरुदेवांना साष्टांग नमस्कार करतात.

पू. वामन यांच्या चैतन्यामुळे आमचा हा चुकांचा सत्संग भावसत्संगासारखाच वाटतो.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/511869.html

– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), फोंडा, गोवा. (१०.८.२०२१)

पू. वामन नामजप करतांना
ध्यान लागले आपुले ।
चित्त प्रभुचरणी निवाले ।।
पू. वामन यांची पारंपरिक पोशाखामधील भावमुद्रा
सोवळे – उपरणे रूप गोजिरे ।
प्रगल्भ भाव मुखावरी विलसे ।।

पू. वामन राजंदेकर यांच्या छायाचित्राकडे बघून काय जाणवते ? ते कळवा !

पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांकडे पाहून साधकांना काय जाणवते किंवा ही छायाचित्रे पाहून काही अनुभूती आल्यास त्या पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : sankalak.goa@gmail.com

टपालासाठीचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.