अफगाणिस्तानाला जगभरातून ८ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य
अफगाणिस्तानला देण्यात येणारे हे साहाय्य देशातील गरिब नागरिकांपर्यंत पोचणार कि तालिबानी त्याचा वापर करणार, याची निश्चिती कोण आणि कशी करणार ? हा प्रश्न आहे. तालिबानची सत्ता असणार्या अफगाणिस्तानला आर्थिक साहाय्य करणे, हा विषारी सापाला दूध पाजण्याचा प्रकार होय ! – संपादक
काबुल – अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यापासून देशाची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. यामुळे अफगाणिस्तानला जगभरातून ८ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य देण्यात येणार आहे. स्वित्झर्लंड येथील जिनेव्हामध्ये झालेल्या ‘डोनर कॉन्फरन्स’मध्ये (अर्पणासाठीच्या परिषदेमध्ये) ही घोषणा करण्यात आली. याविषयी तालिबानच्या हंगामी सरकारमधील परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी याने एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, अफगाणिस्तानला मिळणारे हे पैसे आम्ही विचारपूर्वक खर्च करणार आहोत. (हास्यास्पद विधान ! हा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जाणार, हे वेगळे सांगायला नको ! – संपादक) या पैशांचा वापर दारिद्र्य दूर करण्यासाठी केला जाईल. आम्ही जगभरातील देशांनी केलेल्या साहाय्यासाठी त्यांचे आभार मानतो. ‘भविष्यातही ते अशा प्रकारचे साहाय्य करतील’, अशी अपेक्षा आहे. पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून हा पैसा गरजूंपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सरकार करील.