राहुल गांधी यांच्या श्री वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर ‘भाजयुमो’कडून गंगाजल शिंपडून यात्रामार्गाचे शुद्धीकरण !
‘पाच राज्यांच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसचे नेते हिंदूंची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे येथे जातात अन् नंतर पुढील ५ वर्षे तेथे ढुंकूनही पहात नाहीत’, हे हिंदू जाणून आहेत ! अशा ‘भोंदू’ भाविकांपासून हिंदूंनी सावध रहायला हवे ! – संपादक
श्रीनगर – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या श्री वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर जम्मू-काश्मीरमधील भारतीय जनता युवा मोर्चाकडून (‘भाजयुमो’कडून) यात्रामार्गावर गंगाजल शिंपडून त्याचे शुद्धीकरण करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाचे जम्मू-काश्मीरमधील प्रमुख अरुण जामवाल यांनी ही शुद्धीकरणाची प्रक्रिया केली. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी १३ कि.मी. पायी चालून श्री वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते. ‘राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी श्री वैष्णोदेवीच्या स्थानाचे पावित्र्य भंग केले आहे. त्यांनी यात्रामार्गावर पक्षाचे झेंडे फडकावून घोषणाबाजीही केली’, असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाने केला.