श्री. बबन वाळुंज रुग्णाईत असतांना त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. सौ. निर्मला वाळुंज (पत्नी)
१ अ. यजमान आजारी असतांना एका धर्माभिमानी व्यक्तीने आधार देणे आणि आर्थिक साहाय्य करणे : ‘यजमान आजारी असतांना मला सनातन संस्थेशी जोडलेल्या एका धर्माभिमानी व्यक्तीने आधार दिला. तसेच त्यांनी यजमानांना रुग्णालयात भरती करतांना लागणारे पैसे दिले आणि म्हणाले, ‘‘वाळुंजकाकांजवळ श्री हनुमान आहे. तो त्यांचे रक्षण करत आहे. तेव्हा तुम्ही स्थिर रहा. देव आहे. काळजी करू नका.’’ त्या वेळी ‘गुरुदेव आपली कुणाच्याही माध्यमातून काळजी घेतात’, हे लक्षात आले.
१ आ. यजमानांना रुग्णालयात भरती करतांना ‘डिपॉझिट’साठी लागणारी रक्कम गुरुकृपेने काही घंट्यांतच जमा होणे : रुग्णालयात गेल्यावर ‘आधी ‘डिपॉझिट’ची रक्कम भरा, मग औषधोपचार चालू करता येतील’, असे सांगितले. तेव्हा दुसर्या एका धर्माभिमानी व्यक्तीने तात्काळ काही पैसे दिले आणि माझ्याकडे काही घंट्यांतच पैसे जमा झाले. अशा प्रकारे गुरुदेव प्रत्येक अडचण सोडवत होते आणि मला कसलाही ताण जाणवत नव्हता. याबद्दल मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.
१ इ. मुलांनी वडिलांची चांगल्या प्रकारे सेवा करणे : माझ्या दोन्ही मुली आणि मुलगा वडिलांची काळजी घेत होते. काही अडचणी आल्यास तेच सोडवत होते. मला कुठलाही ताण येऊ देत नव्हते. ‘गुरुदेवांनीच त्यांच्याकडून वडिलांची सेवा करवून घेतली’, असे मला वाटत होते.
‘गुरुदेवांच्या कृपेनेच माझे सौभाग्य वाचले’, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’ (जानेवारी २०२१)
२. सुरेखा वाळुंज (मुलगी)
२ अ. अपघात होता होता वाचणे : ‘वडिलांच्या रक्ताचा आणि छातीचा वैद्यकीय अहवाल घेऊन येतांना मी मार्ग ओलांडण्यासाठी उभी होते. तेव्हा एक दुचाकी माझ्या अंगावर आली. त्या वेळी देवानेच मला अपघात होता होता वाचवले.
२ आ. प्रतिकूल परिस्थितीत स्थिर रहाता येणे : २-३ रुग्णालयांमध्ये गेल्यावर वडिलांची शारीरिक स्थिती बिघडल्यामुळे त्यांना कुठल्याही खासगी रुग्णालयात भरती करून घेण्यास तेथील कर्मचारी आणि आधुनिक वैद्य टाळाटाळ करत होते; पण त्या वेळी देवाने मला स्थिर ठेवले.’ (जानेवारी २०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |