परात्पर गुरुदेवांचे अवतारी कार्य, म्हणजे प्रत्येक जिवाला आनंद देणे
१. आनंदी जीवनासाठी अध्यात्म शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘प्रत्येक वस्तूचा गुणधर्म असतो, उदा. साखरेचा गुणधर्म गोडी. प्रत्येक देवतेचे कार्य ठरलेले असते, उदा. श्रीविष्णूचे कार्य सृष्टीचे पालन करणे. त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य काय असेल ?, तर ‘प्रत्येक जिवाला आनंद देणे.’ परात्पर गुरुदेवांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ यासाठी अध्यात्माचे लिखाण केले आहे. प्रत्येकाला आनंद मिळावा, यासाठी ते अहोरात्र प्रयत्नरत असतात. ते कधीही कुणाला ‘तुझी सेवा किती झाली ? तुम्ही काय केले ? भूतकाळात काय केले किंवा भविष्याचे काय ?’, असे विचारत नाहीत. ‘तुम्ही आनंदी आहात का ?’ एवढे मात्र ते विचारतातच.
२. ‘कोणत्याही स्थितीत दुःख शोधण्याचा स्थायी भाव असलेला मानव आणि त्याउलट प्रत्येकाकडून शिकून स्वतः आनंद घेणारे अन् इतरांनाही आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘कोणत्याही स्थितीत दुःख शोधणे’, असा आपल्या सर्वसाधारण मनुष्याचा स्वभाव आहे. आपल्याला कितीही मिळाले, तरी आपण दुःखी असतो; पण परात्पर गुरुदेव मात्र प्रत्येक स्थितीत आनंदी असतात. ते प्रत्येक स्थितीत आनंद शोधतात. काहीही घडले, तर ते म्हणतात, ‘मला आज हे नवीन शिकायला मिळाले !’ वर्ष २००७ पासून थकव्यामुळे ते खोलीच्या बाहेर जाऊ शकले नाहीत. ते संगणकीय धारिका पडताळण्यासाठी जेथे बसतात तेथून समोरील निसर्ग पहातात. प्रतिदिन त्यांना त्यात नवीन काहीतरी दिसते. त्यांच्या समवेत असणार्या साधकांनाही ते समोरील दृश्य दाखवतात आणि त्यातील आनंद घेतात, उदा. झाडांचा आकार, त्यांच्या वेगवेगळ्या छटा, त्यांचे प्रकार, ‘दरवाजाच्या काचेतून दिसणारे झाड आणि प्रत्यक्ष पाहिल्यावर दिसणारे झाड यांना पाहून काय वाटते ?’, असा अभ्यास करून ते स्वतःही आनंद घेतात आणि इतरांनाही आनंद देतात.
‘आनंद’ हाच स्थायीभाव असणार्या गुरुदेवांच्या चरणी आनंदमय होऊन त्यांच्यात विलीन होण्यासाठी तळमळणार्या सर्व साधकांचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !’
– कु. रूपाली कुलकर्णी, रामनाथी आश्रम, गोवा (१३.८.२०२०)