राज्यात पात्र १०२ टक्के जनतेने कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा, तर ४२ टक्के जनतेने दुसरी मात्रा घेतली आहे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी, १५ सप्टेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी गोव्यात कोरोना प्रतिबंधक लसीसाठी पात्र असलेल्या सर्वांनी म्हणजे १०० टक्के पात्र जनतेने लसीची पहिली मात्रा (डोस) घेतली असल्याचे घोषित केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी खोटी माहिती दिल्याचे सांगत त्यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. त्याचप्रमाणे आरोग्य खात्याने १२ सप्टेंबरला १ सहस्र ५२ रुग्णांना कोरोना लसीची पहिली मात्रा दिल्याचे आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याविषयी जनमानसात शंका उत्पन्न झाली होती. अशातच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी १५ सप्टेंबरला राज्यात आतापर्यंत पात्र १०२ टक्के जनतेने कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा, तर ४२ टक्के जनतेने दुसरी मात्रा घेतली आहे, असे घोषित केले असून यामुळे खळबळ माजली आहे.
याविषयी केंद्रातील आरोग्य मंत्रालयाच्या लसीकरणाविषयीच्या माहितीचा संदर्भ देत मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या नोंदींनुसार गोव्यात १८ वर्षांवरील लोकसंख्या ११ लाख ६६ सहस्र आहे. राज्यात आतापर्यंत ११ लाख ८८ सहस्र नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. हे प्रमाण १०२ टक्के होते. त्याचप्रमाणे राज्यात ५ लाख २१ सहस्र नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली असून हे प्रमाण ४२.०७ टक्के आहे.’’
अधिक माहिती देतांना ते म्हणाले, ‘‘या आठवड्यात १ लाख ७० सहस्र लोक कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेणार आहेत. याप्रमाणे लसीकरण झाल्यास दुसरी मात्रा घेणार्यांचे प्रमाणे ६० टक्के होईल. ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र जनतेला लसीच्या दोन्ही मात्रा देण्याचे लक्ष्य आहे. गोव्यातील स्थलांतरित कामगार आणि विदेशी पर्यटक यांचेही लसीकरण करण्यात येत आहे. उद्यापासून ‘टिका उत्सवा’च्या पुढच्या टप्प्याला प्रारंभ होणार असून विरोधकांनी शासनावर टीका करण्यापेक्षा ‘टिका उत्सवा’चा लाभ घेण्यास जनतेला प्रोत्साहित करावे.’’
दुसरीकडे लसीकरणासंबंधी गोव्यातील आरोग्य खात्याने १२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्या कोरोनाविषयक प्रतिदिनच्या माहितीपत्रकात ‘१२ सप्टेंबर २०२१ या दिवशी एकूण ६ सहस्र ४६८ जणांना लस देण्यात आली. त्यांपैकी १ सहस्र १५२ जणांना लसीची पहिली मात्रा आणि ५ सहस्र ३१६ जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली’, असे म्हटले होते. त्याचप्रमाणे लसीची पहिली मात्रा देण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के असून राज्यातील ३० सहस्र ८५१ जणांना लसीची पहिली मात्रा देण्यात आलेली नाही, असे म्हटले होते.
१०० टक्के पात्र नागरिकांना लसीची पहिली मात्रा दिल्याबद्दल पंतप्रधान अभिनंदन करणार !
राज्यातील १०० टक्के पात्र नागरिकांना लसीची पहिली मात्रा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ सप्टेंबरला ‘ऑनलाईन’ माध्यमातून गोव्याचे आणि विशेषतः १०० टक्के पात्र नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्याचे लक्ष्य गाठणार्या आरोग्य कर्मचार्यांचे अभिनंदन करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १० पैकी ९ रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीची एकही मात्रा (डोस) घेतली नव्हती, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला लसीकरण करवून घेण्याचे आवाहन केले.