सेवेची तीव्र तळमळ असणारे अन् संतांची कृपा संपादन करणारे चि. सचिन हाके आणि साधनेची तळमळ, प्रगल्भ बुद्धी अन् ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्या चि.सौ.कां. स्नेहा झरकर !
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील महाळूंग येथे रहाणारे चि. सचिन हाके आणि पूर्वी बीड येथे रहाणार्या चि.सौ.का. स्नेहा झरकर हे दोघे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करतात. १६.९.२०२१ या दिवशी यांचा विवाह आहे. त्यानिमित्त देवद आश्रमातील संत आणि साधक यांना त्या दोघांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. सचिन हाके आणि चि.सौ.कां. स्नेहा झरकर यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
चि. सचिन हाके यांची गुणवैशिष्ट्ये
पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार
१. शांत, साधा आणि सरळमार्गी असणे
‘श्री. सचिन साधा आणि सरळमार्गी आहे. त्याचा स्वभाव शांत आहे. ‘सचिनचे कुणाशी पटले नाही किंवा त्याने कुणाला दुखावले’, असे मी कधी ऐकले नाही. त्याचे बोलणेही नम्र आहे.
२. मायेपासून अलिप्त असणे
सचिन ‘मायेपासून अलिप्त आहे’, असे जाणवते. त्याला मायेतील कोणत्या गोष्टींविषयी ओढा नाही.
३. निरपेक्ष असणे
सचिन याला कोणत्याही साधकाकडून अपेक्षा किंवा प्रतिक्रिया नसते. तो आपल्याला दिलेली सेवा करत असतो.
४. साधना करण्याचा ठाम निश्चय असणे
काही कालावधीपूर्वी साधनेसाठी प्रतिकूल परिस्थिती असतांनाही सचिनने त्याची साधना चिकाटीने आणि तळमळीने चालू ठेवली. त्याने त्या परिस्थितीवर मात केली. सचिनचा साधना करण्याचा निश्चय ठाम आहे.
५. सेवाभावी वृत्तीमुळे सचिनने संतांची मने जिंकणे
सचिनच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्याला परात्पर गुरु पांडे महाराज आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या सेवा करण्याची संधी मिळाली. परात्पर गुरु पांडे महाराज त्याच्या सेवेचे कौतुक करत असत. त्याच्या सेवाभावी वृत्तीमुळे तो संतांची मने जिंकतो.’ (५.९.२०२१)
सौ. अंजली झरकर (भावी पत्नीची काकू)
१. आधार वाटणे
‘सचिनदादा अतिशय समजूतदार आहेत. त्यांच्या सर्व सहसाधकांना आधार वाटतो.
२. यंत्रावर पोळ्या भाजण्याची सेवा प्रोत्साहन देऊन नम्रतेने शिकवल्याने त्याविषयीची भीती दूर होणे
अधून-मधून मी स्वयंपाकघरात यंत्रावर पोळ्या करण्याच्या सेवेसाठी जाते. आरंभी मी केवळ यंत्रावर कणकेचा गोळा ठेवणे आणि पोळ्या उलटणे एवढेच करत होते. गॅस पेटवणे आणि ‘ऑइलिंग’ करणे यांसारख्या सेवा शिकण्याचे मी टाळत होते. ‘सचिनदादांनी हळूहळू मला त्या सेवा कधी आणि कशा शिकवल्या’, ते मला कळलेही नाही. प्रत्येक वेळी त्यांनी मला या सेवेतील सर्व बारकावे अत्यंत नम्रतेने समजावून सांगितले. ‘‘सेवा परिपूर्ण होण्यासाठी प्रथम ती शिकणे आवश्यक आहे. पुढे आपत्काळात कोणी नसेल. तेव्हा आपल्याला सर्व आले पाहिजे’’, असे सांगून त्यांनी ती सेवा शिकण्यास प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळे माझ्या मनातील भीती दूर झाली.’(२८.८.२०२१)
कु. सुषमा लांडे
१. झोकून देऊन आणि आनंदाने सेवा करणे
‘स्वयंपाकघरात साधकसंख्या अल्प असल्यास अतिरिक्त सेवा असते. तेव्हा दादा सर्व सेवा ताण न घेता लवकर येऊन आनंदाने करतो. अशा वेळी ‘मी सकाळी लवकर आलो होतो. मी आता थकलो आहे; म्हणून ‘मी विश्रांतीला लवकर जाऊ का ?’, असे तो कधीही म्हणत नाही. दादा झोकून देऊन सेवा करतो. त्याच्या समवेत सेवा करतांना ताण येत नाही.
२. मन लावून महाप्रसाद बनवणे
महाप्रसादात त्याने बनवलेले पदार्थ आश्रमातील सर्वांना आवडतात; कारण तो मन लावून स्वयंपाक करतो. कुठलाही पदार्थ बनवतांना ‘तो पदार्थ अधिकाधिक रुचकर कसा होईल ?’, असा तो विचार करतो.
३. अहं अल्प असणे
‘सेवांचे नियोजन करणे किंवा अल्पावधीत अधिकाधिक सेवा कशा करू शकतो ?’, याविषयी त्याला कुणी सुचवल्यास तो त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो. पदार्थ करतांना त्याला इतरांनी काही सुचवल्यास त्या पद्धतीने करतो. तेव्हा त्याच्या मनात ‘मला सेवा येते’ असा अहंचा विचार येत नाही.’ (२७.८.२०२१)
कु. मनीषा शिंदे
१. उत्साही आणि आनंदी
‘सचिनदादा नेहमी उत्साही आणि आनंदी असतो. त्याच्यामुळे वातावरणातही पालट होतो.
२. शांत आणि समजूतदार असणे
त्याचे बोलणेसुद्धा शांत आणि समजून घेणारे असल्यामुळे ‘त्याच्याशी मोकळेपणाने बोलावे’, असे वाटते.
३. चुकांविषयी सकारात्मक राहून प्रयत्न करणे
पू. (सौ.) अश्विनी पवार त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देतात. तेव्हा तो शांतपणे ऐकून घेतो आणि सकारात्मक राहून प्रयत्न करतो.
४. तळमळ आणि भाव
दादा एकदा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेला होता. तो परत आल्यावर मी त्याला विचारले, ‘‘संतांच्या सत्संगात तू त्यांना काय विचारलेस ?’’ त्यावर दादा म्हणाला, ‘‘देवद आश्रमातील स्वयंपाकघर रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरासारखे कधी होईल ?’’ त्या वेळी मला वाटले, ‘त्याने स्वतःविषयी काहीही न विचारता सेवेविषयी विचारले. म्हणजे त्याच्यात समष्टी भाव आहे.’ (२६.८.२०२१)
कु. दीपाली राजेंद्र माळी
१. सद्गुरु राजेंद्रदादांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितल्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करणे आणि सहसाधकांनाही सेवेतील आनंद मिळावा यासाठी त्याविषयी त्यांना सांगणे
‘सद्गुरु राजेंद्रदादांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितल्याप्रमाणे सचिनदादा प्रयत्न करतो आणि आम्हालाही तसे प्रयत्न करण्यास सांगतो.
एकदा आढाव्यामध्ये ‘देवाचे कार्य देवच करवून घेतो’, असा विषय झाला होता. दादाने तो विषय आम्हाला सांगून तसे अनुभवण्यास सांगितले. देवाच्या कृपेने आम्हालाही ते अनुभवता आले आणि सेवेचा ताण न येता आनंद मिळाला. ‘इतरांनाही सेवेतून आनंद मिळावा’, अशी दादाची तळमळ असते.
२. देव आणि संत यांच्याविषयी असलेला भाव
दादा काही दिवस सद्गुरु राजेंद्रदादांकडे त्यांच्या मर्दन सेवेसाठी जायचा. त्यासाठी त्याला पहाटे जावे लागायचे आणि नंतर तो स्वयंपाकघरात सेवेसाठी यायचा. पहाटेपासून सेवेत असूनही दादा आनंदी असायचा. स्वयंपाकाच्या सेवेत अडचणी असल्या, तरीही दादा मर्दन सेवेला जायचा. तो सांगतो, ‘‘संतसेवेमुळे मला पुष्कळ चैतन्य मिळते.’’ यावरून दादाचा संतांविषयी असलेला भाव शिकायला मिळाला. ‘सर्व सेवा देवच करवून घेतो’, अशी त्याची श्रद्धा आहे.’ (२९.८.२०२१)
सौ. विमल गरुड
संतांची भावपूर्ण सेवा करून त्यांचे मन जिंकणे
‘श्री. सचिन हाके याच्या मनात संतांविषयी पुष्कळ भाव आहे. त्यामुळे तो संतांची सेवा मनापासून करतो. त्याने ज्या संतांची सेवा केली, त्या सर्वांचे मन त्याने जिंकले आहे आणि त्याला त्या संतांचे आशीर्वाद मिळाले आहेत. त्याने काही वर्षे परात्पर गुरु पांडे महाराज यांची सेवाही मनोभावे केली आहे.’ (२८.८.२०२१)
चि.सौ.कां. स्नेहा झरकर यांची गुणवैशिष्ट्ये
पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार
१. व्यवस्थितपणा
‘कु. स्नेहाचे वैयक्तिक साहित्य आणि खोलीतील खण नेहमी नीटनेटका अन् व्यवस्थित असतो. त्यातून चांगली स्पंदने येत असतात. तिच्या खणातील कपड्यांच्या घड्यांची टोके एकमेकांना नीट जुळवलेली असतात. काही वेळा एखाद्या कापडाचा आकार नीट नसल्याने त्याची घडी व्यवस्थित घालता येत नाही; पण स्नेहा त्याची घडी बरोबर चौकोनी घालते. तिचा पेहराव (पंजाबी पोशाख किंवा साडी) यांवरही कधी अनावश्यक चुणी नसते. तिचा पेहराव नीटनेटका आणि व्यवस्थित असल्याने त्यातूनही सात्त्विक स्पंदने येतात. ती खोलीची स्वच्छता मनापासून आणि चांगली करते. तिने केलेली स्वच्छता पाहून मन प्रसन्न होते.
२. इतरांना आनंद देणे
तिची २ भावंडे तिच्यापेक्षा लहान आहेत. त्यांना समजून घेतांना ती त्यांच्यापुढे पडते घेऊन त्यांना आनंदी ठेवते. काही वेळा भावंडांमध्ये तिला तिच्या आवडीच्या गोष्टींचा त्याग करावा लागला, तरी ती तो आनंदाने करते. ‘सहसाधकांनाही लहान लहान गोष्टींमधून आनंद कसा देऊ शकतो ?’, असा तिचा विचार असतो.
३. कौशल्यपूर्ण आणि प्रभावी बोलणे
एखाद्याला एखादे सूत्र समजावून सांगण्यात तिचे कौशल्य आहे. ती वयाने लहान असली, तरी तिच्यापेक्षा मोठ्या वयाच्या साधकांना ती चांगल्या पद्धतीने समजावून सांगते. त्या वेळी तिच्या बोलण्यात चढ-उतार नसतो. नम्र आणि मधुर वाणीने ती आपले म्हणणे शांतपणे मांडत असते. तिचे बोलणे प्रभावी आहे.
४. बुद्धी प्रगल्भ असणे
तिची बुद्धी प्रगल्भ आहे. वयाच्या मानाने तिची विचार करण्याची प्रक्रिया पुढच्या टप्प्याची आहे. सात्त्विक आणि प्रगल्भ बुद्धीमुळे वयाने मोठे असलेल्यांनाही ती साधनेत मार्गदर्शन करते.’
(५.९.२०२१)
सौ. अंजली झरकर (चि.सौ.कां. स्नेहाची काकू)
१. समजूतदार आणि लाघवी असणे
‘स्नेहा लहानपणापासूनच पुष्कळ समजूतदार आणि लाघवी आहे. ती जिथे जाईल, तिथे सर्वांना लळा लावते. सुट्टीमध्ये आश्रमात येणार्या बालसाधकांशी तिची पटकन जवळीक होते.
२. हस्ताक्षर मोत्यासारखे असणे
तिचे हस्ताक्षर मोत्यासारखे आहे. तिच्या अगदी जुन्या वह्या पाहिल्या, तरी ‘त्या पहातच रहाव्या’, असे वाटते. ती फलकावर साधकांसाठी मार्गदर्शक सूचना लिहिते. तेव्हा ‘तिच्या सुरेख अक्षरांकडे पहात रहावे’, असे वाटते.
३. मैत्रिणीने ‘नोट्स’ दिल्यावर ‘देव माझ्यासाठी किती करतो’ याची स्नेहाला जाणीव होणे
आमच्या घरच्या काही अडचणींमुळे तिला १० वीसाठी शिकवणी लावली नव्हती. तिच्यातील प्रेमभावामुळे तिची मैत्रिणींशी चांगली जवळीक आहे. तिच्या एका मैत्रिणीने स्वतःच्या ‘नोट्स’ (अभ्यासाची सूत्रे) स्नेहाला अभ्यासासाठी दिल्या. तेव्हा ‘देव माझ्यासाठी किती करतो’, याची तिला जाणीव होती.
४. नियोजनकौशल्य
स्नेहाची आई (सौ. प्रज्ञा झरकर) सोलापूर सेवाकेंद्रात पूर्णवेळ सेवा करत होत्या. तेव्हा ती १० वीत असूनही घरचे सगळे आवरून शाळा, अभ्यास असे सर्व व्यवस्थित करत असे. तिच्यामध्ये नियोजनकौशल्य हा गुण असल्यामुळे ती आपल्या लहान भावंडांचे, म्हणजे कु. निकिता आणि वेदांत यांचे शाळा अन् अभ्यासाचे नियोजन करून देत असे.
५. अंगभूत कला असणे
तिच्यामध्ये पुष्कळ अंगभूत कला आहेत. तिने मेंदी काढणे किंवा चित्रकला यांचे वेगळे असे शिक्षण घेतले नाही; परंतु ती मेंदी आणि चित्रे फारच सुरेख काढते.
६. विषयाची किंवा प्रसंगाची मांडणी कौशल्याने करता येत असल्याने समोरच्याला ते अनुभवता येणे
स्नेहा आणि निकिता दोघीही रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी गेल्यानंतर त्या वर्षातून एकदा घरी येत असत. घरी आल्यानंतर ‘आश्रम आणि साधक यांच्याविषयी किती सांगू’, असे स्नेहाला व्हायचे. ‘साधक किती प्रेम करतात ? आपली काळजी कशी घेतात ? देव आपल्याला कसे घडवतो ?’, यांविषयी स्वतःचे अनुभव ती इतक्या चांगल्या पद्धतीने सांगत असे की, आमच्या मनात ‘कधी एकदा आश्रमात जाऊ’, अशी ओढ निर्माण होत असे. विषयाची किंवा प्रसंगाची मांडणी ती अशा कौशल्याने करते की, समोरच्याला ते सगळे अनुभवता येते.
७. स्नेहाने दिलेले दृष्टीकोन आणि तिच्या विचारांची दिशा यांविषयी ऐकतांना अंतर्मुखता वाढणे
कधी कधी मला निराशा येते. त्या वेळी तिच्याशी चार शब्द बोलले, तरी माझे मन आनंदी होते. तिचे दृष्टीकोन, तिच्या विचारांची दिशा इत्यादींविषयी ऐकतांना माझी अंतर्मुखता वाढते. ‘काहीही झाले, तरी साधनेच्या अनुषंगानेच प्रयत्न करायचे’, याची जाणीवही वाढते.’ (२८.८.२०२१)
कु. सोनाली गायकवाड (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)
१. उत्तम निरीक्षणक्षमता
‘स्नेहामधील निरीक्षणक्षमता आणि तळमळ यांमुळे साधकांचे योग्य निरीक्षण करून ती साधनेत साहाय्य करते.
२. व्यापकत्व
ती आश्रमातील अनेक सेवांचे दायित्व घेते. कुणाचीही सेवा असली, तरी तिला ती आपली वाटून त्यात सहभागी होते. तिच्यात व्यापकत्व आहे.’
स्नेहा असे देवातील अनेक व्यष्टी अन् समष्टी गुणांचा ठेवा ।
स्नेहाविषयी काय लिहावे देवा ।
स्नेहा असे तुझ्यातील अनेक व्यष्टी अन् समष्टी गुणांचा ठेवा ।। १ ।।
कुणालाही वाटावा तिच्यातील गुणांचा हेवा ।
देवा, जसा तुझा सुगंध सर्वत्र दरवळावा ।
तसा आम्हा सर्वांना तिच्यातील दैवी गुणांचा लाभ व्हावा ।। २ ।।
(३१.८.२०२१)
श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)
१. सेवेची चिकाटी आणि तळमळ
‘कु. स्नेहाताई त्यांच्याकडे असणार्या सेवा पूर्ण होईपर्यंत मन लावून आणि चिकाटीने प्रयत्नरत असतात. सेवेत येणार्या अडचणी त्या त्या वेळी विचारून घेऊन सोडवतात. त्यांनी एखादी सेवा कधीही केली नसेल, तर ‘मला जमेल का ?’, असा विचार न करता त्या ती स्वीकारतात, त्यातील बारकावे शिकून घेतात आणि सेवा परिपूर्ण करतात.
२. भावाच्या स्तरावर रहाणे
अ. त्या स्वतः भावाच्या स्तरावर रहातात आणि इतरांनाही तसे करायला शिकवतात.
आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी त्यांच्या मनात भाव अधिक असतो. तार्ईंच्या समोर परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण काढली, तरी त्यांचा भाव जागृत होतो.
इ. काही सेवेनिमित्त त्या काही संतांच्या संपर्कात येतात. तेव्हा संतांनी सांगितलेली सेवा त्या तत्परतेने पूर्ण करून त्याविषयीचा आढावा देतात.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य असणे
स्नेहाताईंमध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य आहे. संतांनी सांगितलेल्या त्यांच्या (स्नेहाताईंच्या) साधनेतील उणिवा भरून काढण्यासाठी त्या तळमळीने प्रयत्न करतात. त्यासाठी उत्तरदायी साधक आणि संत यांचे सातत्याने मार्गदर्शन घेऊन त्या प्रयत्न करतात.’ (२९.८.२०२१)
श्री. विनायक आगवेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)
१. साधनेची तळमळ
‘कु. स्नेहाताई लहान वयात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात आल्या. त्यांना इयत्ता १० वीमध्ये चांगले (७० टक्के) गुण मिळाले होते, तरी त्यांनी साधना करण्याचा निश्चय केला.
२. सेवेतील प्रावीण्य
स्नेहाताई यांनी विविध सेवांचे दायित्व सांभाळले आहे. त्या देवद आश्रमातील विविध सेवा पुढाकार घेऊन करतात. त्यांना एखादी अडचण सांगितली, तर त्यांच्याकडून निश्चितपणे योग्य उत्तर मिळते. त्यांच्या नियमित सेवांव्यतिरिक्त आश्रमातील साधकांच्या वाढदिवसाच्या दिवशी कविता करणे, फलकावर सुवाच्च अक्षरांत विविध विषयांवरील लिखाण लिहिणे, अशा सेवा करण्यात त्यांचे कौशल्य आहे. त्या हाती घेतलेली सेवा तळमळीने, जिद्दीने आणि समयमर्यादेत पूर्ण करतात.’ (२७.८.२०२१)
कु. मनीषा शिंदे
१. त्याग
‘मिरज आश्रमात कु. स्नेहा आणि मी एकत्र सेवा करत होतो. एकदा ‘तिला एक पदार्थ खावा’, असे वाटले. त्यामुळे माझ्या मनात आले, ‘तिला तो पदार्थ द्यावा.’ तेव्हा तिने मला सांगितले, ‘‘अगं ताई, विचार आला, तरी त्याचा त्याग करायचा असतो.’’ हे ऐकल्यावर मला तिच्याकडून ‘कठोर साधना कशी करायची ?’, हे शिकायला मिळाले.
(२६.८.२०२१)
श्री. हृषिकेश गायकवाड
१. आधार वाटणे
‘साधकांनी सेवेतील काही सूत्र किंवा अडचणी ताईला सांगितल्यावर ती प्रत्येक सूत्राचे दायित्व घेते आणि तिला शक्य तेवढे पूर्ण साहाय्य करते. त्यामुळे काही अडचण आल्यास ताईला आपोआप सांगितले जाते. तिच्यातील या गुणामुळे तिचा आधार वाटतो.
२. प्रेमभाव
स्नेहाताई एखाद्या साधकाची मानसिक स्थिती ठीक नसेल, तर स्वतःहून त्याची विचारपूस करते. त्याला योग्य दृष्टीकोन किंवा अन्य काही आवश्यकतेनुसार उपाययोजना सांगते.
३. भाव
काही दिवस ताईला एका संतांच्या खोलीतील सेवा करण्याची संधी मिळाली होती. त्या संदर्भातील काही सूत्रे सांगतांना ती त्या प्रसंगाशी एकरूप होते. त्यामुळे ऐकणार्या साधकांचाही भाव जागृत होतो.’ (१.९.२०२१)
श्री. ऋतुराज उमेश गडकरी
१. अक्षर चांगले नसल्याने फलकावर सूचना लिहिण्याचे टाळणे; परंतु कु. स्नेहाताईने सूचना लिहिण्यास सांगून माझा आत्मविश्वास वाढवणे
‘मी देवद (पनवेल) येथील आश्रमात सेवेला आल्यावर एकदा कु. स्नेहाताईने मला फलकावर एक सूचना लिहायला सांगितली होती. माझे अक्षर चांगले नसल्यामुळे मी ती सूचना अन्य साधिकेला लिहायला सांगितली. ताईला हे लक्षात आल्यावर ताईने मला माझी चूक सांगितली आणि ती सूचना फलकावर मलाच लिहायला सांगितली. मी सूचना लिहिण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूचना व्यवस्थित आणि चांगल्या अक्षरांत लिहिली गेली. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.
२. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता
कधी कधी माझा नामजप झालेला नसतो. त्या वेळी ताईच्या ते लक्षात येते आणि ती मला आधी नामजप करायला सांगते. मला काही त्रास होत असेल, तर ताईला न सांगताही ‘माझ्यावर त्रासदायक आवरण आले आहे’, हे लक्षात येते. यातून ‘ताईमध्ये सूक्ष्मातील कळण्याची क्षमता आहे’, असे जाणवते.’ (१.९.२०२१)
उखाणेवधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे
– कु. पूजा धुरी, साळगाव, कुडाळ. (१५.८.२०१८) |
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |