चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेणार्यांनी जिल्ह्यातील दुर्दशा झालेल्या रस्त्यांचेही श्रेय घ्यावे ! – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे
कणकवली – वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेण्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ लागली आहे; मात्र सत्ताधार्यांकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. विमानतळाचे श्रेय घेणार्यांनी दुर्दशा झालेल्या रस्त्यांचेही श्रेय घ्यावे, अशी उपहासात्मक टीका मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
माजी आमदार उपरकर यांनी येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी उपरकर म्हणाले, ‘‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी येथील विमानतळाचे भूमीपूजन केले; पण हा प्रकल्प पूर्ण होण्यास झालेल्या विलंबाचे श्रेयही राणे यांनी घेतले पाहिजे. तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या मंत्रीपदाच्या काळातही विमानतळ होऊ शकला नाही. आता विमानतळ पूर्ण झाला आहे; मात्र विमानतळापर्यंत जाणारे रस्ते खड्डेमय झाले आहेत. चिपी येथील विमानतळ हा राज्यशासनाचा प्रकल्प आहे. त्याला केंद्रशासनाने केवळ अनुमती दिली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री राणे यांनी अनावश्यक वाद वाढवू नये.’’
विमानतळाच्या नावाखाली भूमी हडपण्याचा डाव फसला !
विमानतळासाठी त्या वेळी ३०० रुपये गुंठा या दराने भूमी घेतल्या गेल्या. त्या भूमी नंतर ८ सहस्र रुपये प्रतिगुंठा दराने शासनाला देण्यात आल्या; मात्र या व्यवहारात स्थानिक जनता उपेक्षितच राहिली. सरकारने विमानतळासाठी ९५० हेक्टर भूमी संपादित केली होती. त्यातील विमानतळासाठी केवळ २५० हेक्टर भूमी लागणार होती. उर्वरित ७०० हेक्टर भूमीच्या ७/१२ वर पेन्सीलने नोंदी करून (त्या वेळी तेथील ७/१२ वर ‘विमानतळासाठी आरक्षित’, अशी पेन्सीलने नोंद करण्यात आली होती.) शासनाच्या माध्यमातून ती भूमी हडप करण्याचा डाव होता. मनसे आणि स्थानिक शेतकरी यांनी वेळीच आवाज उठवल्यामुळे त्या नोंदी काढल्या गेल्या आणि भूमी हडपण्याचा डाव फसला, असे उपरकर यांनी या वेळी सांगितले. (माजी आमदार उपरकर यांनी भूमी हडप करण्याविषयी केलेला आरोप बघता अशा प्रकारे किती प्रकल्पांमध्ये विविध प्रकारचे भ्रष्टाचार होत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)