फोंडा तालुक्यातील निरंकाल भागातील माकडमारे जमातीतील लोकांच्या घरांमध्ये गोवा मुक्तीनंतर ६० वर्षांनी विजेची जोडणी
सौरऊर्जेद्वारे (फोटोव्होल्टीक) केली विजेची व्यवस्था !
गोव्यासारख्या छोट्या राज्यातील एका भागात ६० वर्षांनंतर एखाद्या समाजातील लोकांना वीजपुरवठा होणे, हाच गेल्या ६० वर्षांतील शासनकर्त्यांचा विकास का ? – संपादक
फोंडा, १४ सप्टेंबर (वार्ता.) – फोंडा तालुक्यातील निरंकाल भागात रहाणार्या माकडमारे या जमातीच्या झोपड्या आहेत. या लोकांना वानरमारेही म्हणतात. गोवा मुक्तीनंतर गेली ६० वर्षे या लोकांना विजेची जोडणी देण्यात आली नव्हती. यावर्षी सौरऊर्जेद्वारे (फोटोव्होल्टीक) त्यांच्यासाठी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी जून मासात एका इंग्रजी वृत्तपत्राने या जमातीला जीवनावश्यक सुविधा मिळत नसल्याविषयी ‘माकडमारे जमातीसाठी छत आणि वीज हे दूरचे स्वप्न आहे’, अशा आशयाचा लेख प्रसिद्ध केला होता. त्यानंतर गोवा मानवी हक्क मंडळाने याची स्वत:हुन नोंद घेत आदिवासी कल्याण खात्याच्या संचालकांकडून आणि मुख्य वीज अभियंत्यांकडून अहवाल मागवले होते. या दोन्ही अधिकार्यांनी वीज देण्यासाठी असमर्थतता दर्शवली होती. आदिवासी कल्याण खात्याच्या त्या वेळी असलेल्या संचालिका संध्या कामत यांनी माकडमारे ‘या जमातीची अधिकृतरित्या नोंदणी नसल्याने त्यांच्या खात्याच्या अखत्यारित ते येत नाही’, असे उत्तर दिले होते. त्याचप्रमाणे त्या वेळचे वीजखात्याचे मुख्य अभियंता रघुवीर केणी यांनी ‘माकडमारे जमातीच्या झोपड्या या ज्वलनशील पदार्थांच्या असल्याने तिथे वीजजोडणी देणे धोकादायक ठरू शकते’, असे उत्तर दिले होते. त्यानंतर यावर्षी ‘गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (जी.ई.डी.ए.)’ने त्यांच्या दुर्गम भागात विजेची व्यवस्था करण्याविषयीच्या योजनेखाली या घरांना सौरऊर्जेद्वारे (फोटोव्होल्टीक) विजेची व्यवस्था केली. ३० मे २०२१ म्हणजेच गोवा घटकराज्य दिनाच्या दिवशी ही योजना गोव्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली. या योजनेखाली दुर्गम भागातील वीजजोडणी नसलेल्या लोकांना १०० टक्के वीजजोडणी देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. वीजजोडणी मिळाल्याने या आदिवासी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. या आदिवासींपैकी एक गोपाळ पवार म्हणाले, ‘‘आता आमच्या मुलांना रात्री अभ्यास करता येईल आणि परीक्षेत उत्तीर्ण होता येईल. आता आम्ही रात्री किंवा सकाळी कामाला जाण्यापूर्वी लवकर स्वयंपाक करू शकतो.’’
आता वीजजोडणी मिळाली असली, तरी या आदिवासींसमोर अजूनही काही समस्या आहेत. पावसाळ्यात त्यांच्या झोपड्यांची छते वार्याने उडून जातात, तसेच घरात शौचालयाची सोय नसल्याने त्यांना शौचासाठी उघड्यावर जावे लागते.