‘रावण लीला’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना मानहानीची नोटीस; विनाअट क्षमा मागण्यास सांगितले !
चित्रपटात श्रीराम आणि रावण यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या !
|
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
ठाणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) – १ ऑक्टोबर या दिवशी प्रदर्शित होणार्या ‘रावण लीला’ या चित्रपटाचे शीर्षक, त्याचा फलक, त्याच्या ‘ट्रेलर’मधील (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दाखवल्या जाणार्या काही मिनिटांच्या विज्ञापनातील) काही संवाद, तसेच त्याची ‘टॅगलाईन’ (चित्रपटाचा सारांश किंवा आशय सांगणारे वाक्य) यांमध्ये श्रीराम आणि रावण यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. (आज हिंदू संघटित नसल्यामुळेच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आदी हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्याचे धारिष्ट्य करतात. ‘चित्रपटाला विरोध झाला की, नकारात्मक का होईना; पण प्रसिद्धी मिळते’, अशी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांची धारणा झाली असल्याचे दिसून येते. हे चित्र पालटण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने प्रयत्न करायला हवेत ! – संपादक) श्रीरामाविषयी अपसमज पसरवणारी आणि रावणाचे उदात्तीकरण केल्याविषयी, तसेच खोडसाळपणे, मानहानीकारक अन् आक्षेपार्ह चित्रण केल्याविषयी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांना अंबरनाथ येथील धर्मप्रेमी श्री. कमलेश गुप्ता यांनी १३ सप्टेंबर या दिवशी नोटीस पाठवली. ‘या चित्रपटातील संबंधित प्रसंग आणि संवाद काढून टाकावेत आणि विनाअट क्षमा मागावी’, अशी मागणी त्यांनी या नोटिसीमध्ये केली आहे. त्यांच्या वतीने अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी ही नोटीस बजावली आहे.
नोटीसीमध्ये मांडलेली चित्रपटातील आक्षेपार्ह सूत्रे
१. या चित्रपटाची ‘टॅगलाईन’ ‘राम में क्यों तू ने रावण को देखा’ (रामामध्ये तू रावण का पाहिलास ?) अशी आहे. रावणाने दुष्कर्मे केली असून भगवान विष्णूचे अवतार असलेल्या श्रीरामाने आदर्श धर्माचरणाची शिकवण संपूर्ण जगाला दिली. त्यामुळे ही ‘टॅगलाईन’ जनमानसात चुकीचा संदेश पोचवत आहे.
२. हिंदु धर्मात श्रीरामाच्या आदर्श चरित्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीरामाच्या जीवनावरील ‘रामलीला’ ही नाट्यसंकल्पना उत्तर भारतात प्रसिद्ध आणि हिंदूंवर संस्कार करणारी आहे. त्याच धर्तीवर रावणाचा उदो उदो करण्यासाठी ‘रावण लीला’ हे नाव दिलेला हा चित्रपट पवित्र अशा ‘रामलीला’ या नाट्यसंकल्पनेवर आघात करणारा आहे.
३. या चित्रपटातील ‘ट्रेलर’मध्ये रावण आणि श्रीराम यांची भूमिका साकारणार्या कलाकारांतील संभाषणात रावणाची चांगली बाजू मांडण्याचा, तसेच ‘त्याने केलेले कार्य कसे योग्य होते’, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याउलट श्रीरामाच्या भूमिकेतील कलाकार ‘मी केवळ परमेश्वर आहे; म्हणून माझा जयजयकार करण्यात येतो’, असे म्हणतांना दाखवण्यात आले आहे. या ‘ट्रेलर’मध्ये अन्यही चुकीची, विडंबनात्मक आणि देवतांची मानहानी करणारी दृश्ये दाखवण्यात आली आहेत. यातून समाजात चुकीचा संदेश जात असून त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. चित्रपटात रावणाचे उदात्तीकरण करण्यात आले असून मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करून हिंदूंच्या मनातील त्यांचे स्थान डळमळीत करण्याचे हे षड्यंत्र हिंदूंनी वैध मार्गाने रोखावे ! – संपादक)
४. चित्रपटाचे फलक, शीर्षक आणि ‘टॅगलाईन’ यांमध्ये श्रीराम आणि रावण यांची पूर्णपणे चुकीच्या आणि अश्लाघ्य पद्धतीने तुलना करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह विधाने आणि संवाद हटवण्यात यावेत, तसेच चित्रपटाचे नाव आणि ‘टॅगलाईन’ही काढून टाकावी, अशी मागणी नोटीसीमध्ये करण्यात आली आहे.
५. चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक गज्जर, निर्माते धवल गाडा, अक्षय गाडा, पार्थ गज्जर, रिचा सचन, तसेच संवाद लेखक आणि कलाकार या सगळ्यांवर आरोप करत चित्रपटाचा विषय, पटकथा आदी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली असून ती दिशाभूल करणारी आहे, असे नोटीसीमध्ये सांगण्यात आले आहे.