पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी यांनी रुग्णाईत असतांना केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती
१. रुग्णाईत असतांना पू. आईंनी भावपूर्णरित्या नामजप करणे आणि ‘परम पूज्य, परम पूज्य’ अन् ‘कृष्ण, कृष्ण’, असा नामजप सतत करणे
‘६.११.२०२० या दिवशी पू. आईंना (पू. लोखंडेआजींना) अर्धांगवायूचा झटका आला. त्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्यांना नामजपादी उपाय करायला सांगितले होते. पू. आई ते उपाय भावपूर्णरित्या आणि तळमळीने करायच्या. त्यांचा सतत ‘परम पूज्य, परम पूज्य’ आणि ‘कृष्ण, कृष्ण’, असा नामजप चालू असतो. आमच्याशी काही बोलून झाले की, लगेच त्यांचा नामजप चालू होतो.
२. पू. आईंना आलेल्या अनुभूती
२ अ. स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी धीर देणे : ६.११.२०२० या दिवशी रात्री पू. आईंच्या स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आल्या. त्यांनी पू. आईंना विचारले, ‘तुम्ही बर्या आहात का ?’ नंतर त्यांनी पू. आईंच्या पायावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यांचा हात हातात घेऊन सांगितले, ‘तुम्हाला बरे वाटेल. काळजी करू नका.’ दुसर्या दिवशी सकाळी पू. आई उठल्यावर त्या पुष्कळ आनंदाने हे सांगत होत्या.
२ आ. स्वप्नात एका स्त्रीने (देवीने) पू. आईंच्या पायावरून हात फिरवणे
२ आ १. स्वप्नात एका स्त्रीने पू. आईंच्या पायावरून हात फिरवून ‘काळजी करू नको, बरे वाटेल’, असे सांगणे आणि दुसर्या दिवशी पू. आई पायाची हालचाल करू शकणे : त्यानंतर १५ दिवसांनी पू. आईंच्या स्वप्नात एक स्त्री आली. पू. आईंनी तिला सांगितले, ‘माझ्या शरिराची एक बाजू जराही हालत नाही.’ तेव्हा त्या स्त्रीने पू. आईंच्या पायावरून हात फिरवला आणि सांगितले, ‘बरे वाटेल. काळजी करू नको.’ सकाळी उठल्यावर पू. आईंच्या लक्षात आले, ‘नेहमीच्या तुलनेत पायात हलकेपणा जाणवत आहे आणि पायाची थोडीफार हालचाल करता येत आहे.’
२ आ २. १५ दिवसांनी पू. आईंना पुन्हा तसेच स्वप्न पडणे आणि दुसर्या दिवशी त्यांना पाय उचलता येऊ लागल्यावर त्यांनी ‘माझ्या स्वप्नात देवी येते अन् मला शक्ती देऊन बरे करते’, असे सांगणे : त्यानंतर १५ दिवसांनी पुन्हा तीच स्त्री पू. आजींच्या स्वप्नात आली. तेव्हाही तिने पू. आईंच्या पायावरून हात फिरवला आणि सांगितले, ‘तुला बरे वाटेल. काळजी करू नको.’ दुसर्या दिवशी सकाळी पू. आईंना पाय उचलता येऊ लागला. तेव्हा त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘माझ्या स्वप्नात देवीच येते आणि मला शक्ती देऊन बरे करते.’’ (‘ती स्त्री, म्हणजे एक देवी असून पू. आईंच्या स्वप्नात येऊन ती त्यांना शक्ती देत होती’, असे आम्हा सर्व कुटुंबियांना जाणवले.) पूर्वीपासून पू. आई देवीची उपासना मनोभावे करतात.’
– श्रीमती इंदुबाई भुकन (पू. लोखंडेआजींच्या कन्या, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२१)