अमरावती येथील वर्धा नदीत नाव उलटून बुडालेल्या ११ जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले !
अमरावती – येथील वर्धा नदीत नाव उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना १४ सप्टेंबर या दिवशी घडली होती. हे सर्व लोक जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथील होते. या घटनेतील ३ मृतदेह सापडले असून उर्वरित ८ जणांचा शोध चालू आहे. एकाच कुटुंबातील ११ जण हे गाडेगाव येथील मते कुटुंबियांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते.
शोधकार्य चालू असून दुपारी १ वाजेपर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एक लहान मुलगी यांचा समावेश आहे. पोलीस आणि बचाव पथक यांच्या साहाय्याने इतरांचा शोध चालू आहे. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांच्या संगमवार हे ठिकाण आहे. झुंज या पर्यटन क्षेत्रावर या मासात सहस्रों भाविक येत असतात. नदीचे पात्र मोठे असल्याने तिथे ‘बोटींग’ करण्यात येते. क्षमतेपेक्षा अधिक लोक या नावेत बसल्यामुळे ती उलटली असल्याचा अंदाज आहे.