नंदुरबार येथे वाहत्‍या पाण्‍यात विसर्जन करण्‍यास नगरपरिषदेने बंदी घातल्‍याने गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांत अप्रसन्‍नता !

  • कोरोनाच्‍या आपत्‍काळातही सामाजिक नियमांचे काटेकोर पालन करून श्री गणेशमूर्तीविसर्जन वाहत्‍या पाण्‍यात कसे करू शकतो, हे प्रशासनाने पहायला हवे होते ! चांगले नियोजन केले असते, तर ठराविक भाविकांची मर्यादा घालून मूर्तीविसर्जन वाहत्‍या पाण्‍यात करणे अशक्‍य नव्‍हते ! – संपादक 
  • शिक्षक संघटना, राजकीय पक्षांचे मेळावे मोठ्या गर्दीत पार पडले. एका मंत्र्याच्‍या उपस्‍थितीत भव्‍य मिरवणुकही निघाली होती. तेव्‍हा कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई न करणारे प्रशासन गणेशोत्‍सवाप्रसंगी उतावीळ का ? – संपादक 
प्रतीकात्मक छायाचित्र

नंदुरबार, १४ सप्‍टेंबर (वार्ता.) – येथून जवळच असलेल्‍या ‘प्रकाशा’ या ठिकाणी तापी नदीवर वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन व्‍हायचे; परंतु या वर्षी कोरोनाचे कारण दाखवून स्‍थानिक प्रशासन श्री गणेशमूर्ती प्रकाशा येथे नेण्‍यास मज्‍जाव करत आहे. त्‍यामुळे विसर्जनाच्‍या दिवशी भक्‍तांना श्री गणेशमूर्ती नगरपरषदेच्‍या ट्रकमध्‍ये ठेवून परतावे लागले. प्रशासनाच्‍या धोरणामुळे गणेशोत्‍सव मंडळे नाखूष असून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप आणि प्रतिक्रिया समाजात उमटत आहेत.

विसर्जनाच्‍या संदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना देणारे परिपत्रक काढले आहे. त्‍यात ‘मूर्ती कृत्रिम तलावात नेऊन विसर्जित कराव्‍यात’, असे म्‍हटले आहे. ‘नदीवर विसर्जित करू नये’; असे म्‍हटलेले नाही. नगरपरिषदेच्‍या वतीने नाल्‍याच्‍या पात्रात (जिथे पाणीच उपलब्‍ध नाही) थातुरमातुर कृत्रिम हौद सिद्ध केला आहे.

‘श्री गणेशमूर्ती नगरपरिषदेच्‍या नियोजित वाहनात ठेवून विसर्जनस्‍थळी न्‍यावी’, असा दडपशाहीचा आदेश नंदुरबार प्रशासन कार्यकर्त्‍यांना देत आहे. गेल्‍या वर्षी प्रशासनाच्‍या अशाच मनमानी कारभारामुळे काही गणेशमूर्ती दुभंगण्‍याचे प्रकार घडले होते.

मानाच्‍या दादा आणि बाबा गणपतींच्‍या भेटीची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा खंडित होणार ?

नंदुरबार शहरात दादा गणपति आणि बाबा गणपति यांच्‍या भेटीची १३८ वर्षांची असलेली ऐतिहासिक परंपरा आहे. पारंपरिक पद्धतीने रथावरच मातीच्‍या गणेशमूर्ती साकारून अनंत चतुर्दशीच्‍या दिवशी पारंपरिक वाद्य आणि लेझीम पथकासमवेत सवाद्य मिरवणुकीने दोन्‍ही मानाच्‍या गणपतींची भेट होते आणि या भेटीचा संपूर्ण नंदनगरीला वेध लागलेला असतो. या वर्षी कोरोनाच्‍या नियमांचे कारण देत या ऐतिहासिक भेटीच्‍या मिरवणुकांना प्रशासनाने अनुमती नाकारली आहे. ‘कोरोनाचे सर्व नियम पाळू’ असे आश्‍वासन देऊनही अनुमती नाकारली जात असल्‍याने शहरातील गणेशभक्‍तांमध्‍ये तीव्र अप्रसन्‍नता आहे.