सनातन संस्थेच्या कार्याचा प्रवास
प्रारंभी स्थुलातून सूक्ष्माकडे अन् आता सूक्ष्मातून स्थुलाकडे !
‘सनातनच्या कार्याला प्रथम स्थुलातून आरंभ झाला. यामध्ये सत्संग घेणे, प्रचारसभा घेणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके प्रकाशित करणे, विविध मोहिमा राबवणे इत्यादींनी कार्य चालू झाले. त्यानंतर कार्याची व्याप्ती वाढू लागल्यावर साधकांना वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात जाणवू लागला. त्यानंतर वाईट शक्तींनी कार्यात निर्माण केलेले अडथळे दूर होऊन कार्य नीट व्हावे, यासाठी विविध आध्यात्मिक स्तरावरील उपाय, उदा. आध्यात्मिक शुद्धी करणे, दृष्ट काढणे, प्रार्थना, न्यास, नामजप इत्यादी करून साधक स्थुलाला सूक्ष्माची जोड देऊ लागले. आता सनातनचे संत आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असणारे साधक कार्यासाठी नियमितपणे नामजप करत आहेत. त्यांच्या या नामजपामुळे स्थुलातून चालू असणार्या कार्याला आता प्रचंड वेग आला आहे. याची ठळक उदाहरणे म्हणजे, कोरोनाच्या काळात सर्वत्र दळणवळण बंदी चालू झाल्यावर साधकांचे बाहेर जाऊन प्रसार करणे थांबले; परंतु ‘प्रसार चालू रहावा’, यासाठी ‘ऑनलाईन सत्संग’ चालू केल्यावर त्याला समाजातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. सनातनच्या विविध प्रकाशनांसाठी या दळणवळण बंदीच्या काळातही समाजातून विज्ञापने मिळतच आहेत.
थोडक्यात सनातनचे काळानुरूप चालू असलेले कार्य हे देवाचे कार्य असल्यामुळे ‘देव सूक्ष्मातून स्थुलातील कार्य कसे करवून घेतो ?’, याची ही प्रचीती आहे. ’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |