पुणे येथे ‘निर्माल्य टू निसर्ग’ या उपक्रमांतर्गत कचरावेचक घरोघरी जाऊन नागरिकांकडून निर्माल्य गोळा करणार !
कचरावेचकांनी गोळा केलेले निर्माल्य प्रक्रिया करण्यासाठी देण्याऐवजी नदीत विसर्जन करावे. निर्माल्यामध्ये आलेली पवित्रके नदीद्वारे सर्वत्र पसरून त्याचा लाभ सर्वांना होईल. निर्माल्याची प्रक्रिया करण्याऐवजी नदीत विसर्जन केल्याने धर्मपालनाचे लाभही होतील. – संपादक
पुणे, १४ सप्टेंबर – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘निर्माल्य टू निसर्ग’ या उपक्रमांतर्गत कचरावेचकांनी घरोघरी जाऊन नागरिकांकडून निर्माल्य वेगळे गोळा करण्यास प्रारंभ केला आहे. हे कचर्यापासून वेगळे संकलित केलेले निर्माल्य महापालिका नैसर्गिकरित्या जिरवणार आहे. महापालिका, ‘स्वच्छ पुणे’ आणि कमिन्स इंडिया आस्थापन यांच्या वतीने मागील ११ वर्षांपासून एकत्रितपणे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये ‘स्वच्छ संस्थे’चे कचरावेचक नागरिकांकडून निर्माल्य गोळा करतात आणि हे निर्माल्य महापालिकेच्या गाड्यांकडे पुढील प्रक्रियेसाठी दिले जाते.
पूर्वी कचरावेचक नदीकाठी थांबून निर्माल्य गोळा करत असल्याची माहिती ‘स्वच्छ संस्थे’चे ऑपरेशन्स हेड आलोक गोगटे यांनी दिली, तसेच १५ आणि १६ सप्टेंबर या दिवशी निर्माल्य कचरावेचकांना देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.