५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अकोला येथील चि. अर्णव धीरज राऊत (वय २ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अर्णव धीरज राऊत एक आहे !
आज भाद्रपद शुक्ल पक्ष नवमी (१५.९.२०२१) या दिवशी अकोला येथील चि. अर्णव धीरज राऊत याचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या वडिलांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
चि. अर्णव धीरज राऊत याला दुसर्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
१ अ. दुसरे बाळ होण्याविषयी कुटुंबियांची अप्रसन्नता जाणवणे; मात्र आधुनिक वैद्यांनी पुन्हा विचार करण्यास सांगणे : ‘आम्ही उभयतांनी ‘दुसरे बाळ व्हावे’, याविषयी विचार केला नव्हता. सौ. देवयानीला (पत्नीला) दुसर्यांदा दिवस गेले. तेव्हा कुटुंबातील सदस्यांची अप्रसन्नता जाणवत होती. घरातील तणावाची स्थिती पाहून आम्ही ‘बाळ नको’, असा विचार करून त्या संदर्भात आधुनिक वैद्यांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवले; मात्र त्यांनी आम्हाला ‘पुन्हा विचार करा’, असे सांगितले.
१ आ. पू. पात्रीकरकाकांनी ‘हिंदु धर्मात भ्रूणहत्या हे पाप असून त्याला प्रायश्चित्त नाही’, असे सांगणे : याविषयी माझे एका साधिकेशी बोलणे झाले. तेव्हा तिने सांगितले, ‘‘तुम्ही मनाने निर्णय न घेता पू. पात्रीकरकाकांना विचारून घ्या.’’ पू. पात्रीकरकाकांनी सांगितले, ‘‘हिंदु धर्मात भ्रूणहत्या हे पाप आहे आणि त्याला प्रायश्चित्तही नाही.’’
२. गर्भारपण
२ अ. पहिला मास : पू. पात्रीकरकाका यांनी दिलेल्या दृष्टीकोनानुसार ‘बाळ होऊ द्यायचे’, असा निर्णय घेणे, पू. पात्रीकरकाकांनी ‘बालरक्षण मंत्र’ देऊन तो करायला सांगणे : पू. पात्रीकरकाका यांनी दिलेल्या दृष्टीकोनानुसार आम्ही गर्भ ठेवण्याचा निर्णय घेतला. नंतर पू. पात्रीकरकाकांनी पत्नीला पहिल्या मासापासून ‘बालरक्षण मंत्र’ देऊन तो करायला सांगितला; पण ती मंत्रजप करायला मध्ये मध्ये विसरत होती. पू. पात्रीकरकाकाच आम्हाला त्याची आठवण करून देत असत. त्यासाठी आम्हाला कृतज्ञता वाटते. शेवटच्या मासात सौ. देवयानीने तो मंत्रजप सातत्याने केला.
२ आ. पाचवा मास : गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या ‘संस्कारयज्ञा’चा लाभ होणे : गायत्री परिवार यांनी आयोजित केलेल्या ‘संस्कारयज्ञा’मध्ये आम्ही सलग ५ रविवार सहभागी झालो होतो. हे यज्ञ सौ. देवयानीला पाचवा आणि सातवा मास असतांना केले गेले. आमच्या घरातील वातावरण नेहमी तणावाचे असल्यामुळे घरी असे काहीच संस्कार किंवा स्तोत्रपठण करता आले नाही.
२ इ. सहावा मास : स्वप्नात साप दिसणे आणि घरातही साप दिसणे, दत्ताचा नामजप करू लागल्यावर स्वप्नातील साप दिसणे बंद होणे : सौ. देवयानीला सहावा मास असतांना तिला एका रात्री स्वप्नामध्ये साप दिसला आणि तसाच साप दुसर्या दिवशी घरातही दिसला. याविषयी पू. पात्रीकरकाकांना सांगितल्यावर त्यांनी त्यावर उपाय म्हणून आम्हाला दत्ताचा नामजप करण्यास सांगितला. तो नामजप आम्ही सातत्याने केल्यामुळे सौ. देवयानीला साप दिसणे बंद झाले.
३. सातवा मास आणि बाळाचा जन्म
३ अ. सौ. देवयानीला सातवा मास असतांना त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात भरती करणे, आधुनिक वैद्यांनी ‘दोघांपैकी एकालाच वाचवू शकतो’, असे सांगणे : सातव्या मासात पोळ्याची (बैलपोळा) अमावास्या होती. त्या रात्री अकस्मात्पणे देवयानीला त्रास व्हायला लागला. तिला रुग्णालयात भरती केल्यावर आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘शस्त्रकर्म लगेच करावे लागेल; परंतु आता दोघांपैकी एकालाच वाचवू शकतो. हा धोका टळण्यासाठी ३ दिवस तरी गेले पाहिजेत.’’
३ आ. पू. पात्रीकरकाकांना सर्व परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगणे : ही सर्व परिस्थिती पू. पात्रीकरकाकांना सांगितल्यावर त्यांनी आम्हाला कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगितला. आमच्याकडून कुलदेवतेचा नामजप पुष्कळ आर्ततेने आणि भावपूर्ण होत होता. ही गुरुकृपाच होती. सौ. देवयानी पू. भार्गवराम (सनातनचे पहिले बालसंत) यांच्याविषयीचा ग्रंथ पोटावर ठेवून नामजप करत होती. ती तो ग्रंथ वाचत होती आणि पू. भार्गवराम यांच्याविषयीची चलचित्रेही पहात होती. ती हे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत असतांना गर्भातील बाळ प्रतिसाद देत असल्याचे तिला जाणवत होते.
३ इ. आधुनिक वैद्यांनी रात्री २ वाजता शस्त्रकर्म करण्याचे नियोजन करणे, तेव्हा गुरुमाऊलीला ‘ही अवेळ टळू दे’, अशी प्रार्थना केल्यावर पहाटे ब्राह्ममुहूर्तावर शस्त्रकर्म होणे : ७ तारखेला रात्री २ वाजता डॉक्टरांनी सांगितले, ‘‘आताच शस्त्रकर्म करावे लागेल.’’ रात्री २ वाजताची वेळ मला अयोग्य वाटली; म्हणून मी गुरुमाऊलीला मनोमन प्रार्थना केली, ‘देवा, तुम्हीच बाळाच्या जन्माची वेळ निश्चित करा. ही वेळ टळून जाऊ दे.’ त्यानंतर आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म केले, तेव्हा पहाटे ३.३४ वाजले होते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर बाळाचा जन्म झाला.
अशा प्रकारे गुरुदेवांच्या कृपेने सौ. देवयानीने आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि नामजप केल्यामुळे आधुनिक वैद्यांनी दिलेला ३ दिवसांचा धोक्याचा कालावधी टळून गेला आणि रुग्णालयात भरती केल्यापासून ९ व्या दिवशी बाळाचा जन्म होऊन मुलगा झाला.
४. जन्मानंतर
४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांची अनुभवलेली कृपा !
१. बाळाचा जन्म सातव्या मासात झाल्यामुळे त्याला २७ दिवस अतीदक्षता विभागात काचेच्या पेटीत ठेवावे लागले. एकदा सौ. देवयानी प्रार्थना करत असतांना तिला ‘तिच्या खोलीत माझ्या समवेत परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून आले आहेत’, असे जाणवले. त्यामुळे तिची भावजागृती झाली.
२. एकदा सौ. देवयानीला स्वप्नात दिसले, ‘परात्पर गुरु डॉक्टर तिला म्हणत आहेत, ‘मी या बाळाचा आजोबा आहे. याची आध्यात्मिक पातळी इतकी आहे’; मात्र ‘किती आहे ?’ हे तिला ऐकू आले नाही.
४ आ. अनुभूती
४ आ १. मुसळधार पावसातून बाळासाठी गायीचे दूध रुग्णालयात नेऊन देणे अवघड होणे, तेव्हा देवयानीने ‘दूध आणेपर्यंत तरी पाऊस थांबू दे’, अशी कृष्णाला प्रार्थना केल्यावर अकस्मात् पाऊस थांबणे : सप्टेंबर मासात अकोल्याला मुसळधार पाऊस पडत होता. बाळासाठी प्रतिदिन बाहेरून गायीचे दूध नेऊन द्यावे लागत असे. ‘अशा मुसळधार पावसात दूध कसे नेणार ?’, ही समस्या होती. सौ. देवयानीने श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘देवा, तुझ्या जन्माच्या वेळीही असाच पाऊस होता. तुझ्याच कृपेमुळे वासुदेवाला तुला सुखरूपपणे नेता आले. आताही बाळासाठी दूध आणतांना पाऊस थांबू दे. तूच हे दूध बाळापर्यंत नेऊन दे.’ तेव्हा अकस्मात्पणे पाऊस थांबला. त्यामुळे आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
४ इ. बाळाने ‘बालरक्षण’ मंत्र ऐकून हसून प्रतिसाद देणे : बाळाला पेटीत ठेवल्यावर सौ. देवयानी पहिल्यांदाच बाळाला पहायला गेली होती. तिने ‘बालरक्षण’ मंत्र म्हटल्यावर बाळाने हसून प्रतिसाद दिला. तेव्हा तो केवळ ४ दिवसांचा होता.
४ ई. चि. अर्णवला परात्पर गुरु डॉक्टरांविषयी असलेली ओढ !
अ. बाळाला (अर्णवला) परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवल्यावर तो त्यावर झेप घेतो.
आ. १३ मे आणि १५ मे २०२० या दिवशी गुरुमाऊलीच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी तो शांत अन् आनंदी वाटत होता.
– श्री. धीरज राऊत (वडील), अकोला (ऑगस्ट २०२०)
५. पूर्वसूचना
‘एकदा मी ब्राह्ममुहूर्तावर नामजपासाठी उठलो होतो. त्या वेळी मला आमच्या दारात एक बाळ दिसले. मी बाळाला विचारले, ‘तू धीरजचे बाळ आहेस का ?’ तेव्हा बाळाने होकारार्थी मान हालवली.
६. अनुभूती – या धारिकेचे टंकलेखन करतांना माझी भावजागृती होत होती.’
– श्री. श्याम राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), अकोला (ऑगस्ट २०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |