समष्टी सेवेत श्रीकृष्णाला अनुभवणारे आणि कृतज्ञताभावात रहाणारे पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर (वय ३६ वर्षे) !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांना व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना स्वतःत जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

‘मी अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेते. त्या वेळी ‘त्यांचे प्रतिदिनचे व्यष्टीचे प्रयत्न प्रामाणिकपणे आणि परिपूर्ण केलेले असतात’, असे माझ्या लक्षात आले. त्यांचे भावजागृतीचे प्रयत्नही वाढले असून आता त्यांच्या बोलण्यात ओलावा निर्माण झाला आहे. ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.’

– (सद्गुरु) कु. स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. नीलेश सांगोलकर

१. जाणवलेले पालट

१ अ. आसक्ती न्यून होणे : ‘पूर्वी मला पैशांची पुष्कळ आसक्ती होती; पण आता ‘तशी आसक्ती राहिली नाही. ‘मला न्यायालयात वैयक्तिक व्यवसाय (प्रॅक्टिस) करण्याची काहीच आसक्ती किंवा ओढ राहिली नाही’, असे जाणवते. कधी कधी तर ‘मी अधिवक्ता आहे’, याचाही मला विसर पडतो.

१ आ. ‘सर्वांप्रती साक्षीभाव निर्माण झाला आहे’, असे मला अनुभवता येत आहे.

१ इ. अंतर्मुखता निर्माण होणे : माझ्या मनात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी पुष्कळ अंतर्मुखता निर्माण झाली आहे अन् त्यामुळे मला संतांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.

१ ई. व्यष्टी साधनेचे करत असलेले प्रयत्न आणि जाणवलेले पालट

१. सारणी लिखाण करतांना लेखणी आणि कागद यांच्याप्रती कृतज्ञताभाव आपोआप जागृत होतो.

२. ज्या चुकीविषयी सत्र करत आहे किंवा ज्यांच्याविषयी चूक झाली आहे, त्यांची मी सत्र करून झाल्यावर मानसरित्या क्षमायाचना करतो. त्या वेळी मी त्यांच्या चरणांवर मानसरित्या डोके टेकवतो.

३. आम्हाला प्रत्येक ३-४ मासांनी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन होते. ‘मला सातत्याने त्यांचे मार्गदर्शन होत असून त्या मला सांगत असलेली सूत्रे मी लिहून घेत आहे’, असे मला जाणवते.

४. माझा नामजप एकाग्रतेने होतो. ‘देवच नामजप करवून घेत आहे’, असे मला वाटते. ‘हे गुरुमाऊली, नामजप करत असतांना मला साक्षात् तुमचे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होते.

५. १८.३.२०२० पासून (दळणवळण बंदीमुळे) मी घरीच आहे; परंतु ‘दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका किंवा चित्रपट पहावा’, असे मला एकदाही वाटले नाही. ‘माझ्या मनावरील तो संस्कार पुसला गेला आहे’, असे मला जाणवते. मला साधनेतूनच आनंद घेता येतो.

६. ‘माझ्या मनाच्या आनंदावस्थेत पुष्कळ वाढ झाली आहे’, असे माझ्या लक्षात येते. मला सातत्याने ईश्वर समवेत असल्याचे अनुभवायला मिळते.

१ उ. समष्टी सेवा करतांना करत असलेले प्रयत्न आणि जाणवलेले पालट

१. मला थोडा शारीरिक त्रास होतो; पण त्रासाकडे दुर्लक्ष करून मी सेवा करतो. त्यातही मला आनंद जाणवतो. त्रास होत असतांना ‘या त्रासामुळेच मला देवाचे स्मरण सतत होते’, असे जाणवते.

२. ‘समष्टी सेवा करतांना माझ्यासमोर गुरुमाऊलींचे रूप आहे आणि मी ‘सेवक’ या भावाने सेवा करत आहे’, असे मला पुष्कळ वेळा जाणवते. त्या वेळी ‘मी शून्य असून शून्याच्या त्या पोकळीतून गुरुदेवच सर्वकाही करवून घेत आहेत’, असे जाणवून मला पुष्कळ आनंद आणि कृतज्ञता वाटते.

३. ‘जे साधक सेवेसाठी माझ्या समवेत आहेत, त्यांच्यामध्ये गुरुमाऊलींचे रूप आहे. ते सर्व माझ्या साधनेसाठी साहाय्यक असून ते मला सर्व शिकवतही आहेत’, असे मला पुष्कळ वेळा जाणवते. मी हे सर्व श्रीकृष्णाला सांगून त्याच्याशी बोलतो.

१ ऊ. कृतज्ञताभाव वाढल्याचे जाणवणे

१. ‘ईश्वराच्या कृपेने ‘गुरुकृपा’ या घरामध्ये मला रहायला मिळाले’, यासाठी आणि कुटुंबियांविषयी अन् इतरही सर्वच गोष्टींविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

२. मला माझ्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते. साक्षात् सद्गुरु स्वातीताई माझा आढावा घेत असल्याने माझे अंतःकरण भरून येते. ‘माझ्या गुरुमाऊलीने माझ्यासारख्या पामर जिवात सात्त्विकता निर्माण होण्यासाठी मला सद्गुरूंच्या सान्निध्यात ठेवले आहे’, असे वाटून माझ्याकडून गुरुचरणी क्षमायाचना होते आणि अपार कृतज्ञताही जाणवते.

३. ‘गुरुमाऊलींनी मला इतके दिले आहे’, याविषयी माझी कृतज्ञता अल्प पडत असल्याचे जाणवून मला पुष्कळ खंत वाटते आणि त्यांच्या चरणी क्षमायाचना केली जाते. कृतज्ञता आणि शरणागती जाणवण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे.

४. मला संतांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळत आहेत. तेच सर्वकाही करवून घेत आहेत. मी शून्य आहे. ‘मी फार न्यून पडतो’, ही भावना वाढली आहे. ‘अजून नेमकेपणाने मी काय प्रयत्न करू ?’, असा माझा विचार असतो. ‘गुरुदेवांना आनंद देण्यासाठी जे काही करता येईल, ते सर्व प्रयत्न कृतज्ञताभावाने पूर्ण करायचे आहेत’, असा भाव माझ्या मनात असतो. गुरुदेव, माझ्यामध्ये हा भाव सद्गुरु स्वातीताई, ईश्वर आणि तुमच्या कृपेनेच निर्माण झाला आहे.

५. ‘अस्तित्व माझे न उरावे, तुजमध्ये मी मजला हरवावे ।
शोधूनीही कधीच न गवसावे, तुझ्या भक्तीत सर्वच हरपावे ।।’

अशी गुरुमाऊलींना प्रार्थना करतांना माझी पुष्कळ भावजागृती होते. घरातील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राखाली वरील ओळी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे माझी सातत्याने भावजागृती होते.

२. आलेल्या अनुभूती

२ अ. संतांच्या आवाजात मार्गदर्शन ऐकू येणे आणि त्या वेळी भावजागृती होणे : वेळोवेळी संतांनी केलेले मार्गदर्शन आणि सत्संगात माझ्यासाठी सांगितलेली सूत्रे मला त्यांच्याच आवाजात ऐकू येतात. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटून मला रडायला येते.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना तळमळीने प्रार्थना केल्यावर स्थुलातून मुलीने जवळ येऊन प्रेमाने डोक्यावरून हात फिरवणे आणि ‘तिच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वरच प्रीती करत आहे’, असे जाणवणे : ‘माझे परम पूज्य माझ्या समवेत आहेत आणि ते माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आहेत’, असे मला जाणवते. माझ्याकडून त्यांनाच आढावा सांगितला जातो आणि ‘सर्व प्रयत्न करण्यास मी असमर्थ आहे. तुम्हीच मला मार्ग दाखवा’, अशी तळमळीने प्रार्थना करतो. त्या वेळी माझी छोटी मुलगी कु. देवांशी स्थुलातून जवळ येते आणि माझ्या डोक्यावरून अन् दोन्ही गालांवरून प्रेमाने हात फिरवते. त्या वेळी ‘तिच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वरच माझ्यावर प्रीती करत आहे’, असे मला जाणवते.

२ इ. संत आणि सद्गुरु यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घरातील खोलीत पुष्कळ थंडावा जाणवणे आणि तो अडीच मास टिकून रहाणे : आमच्या घरातील ज्या खोलीत सेवेनिमित्त संत आणि सद्गुरु यांचे वास्तव्य होऊन त्यांचा सत्संग लाभला आहे, त्या खोलीतच आम्ही सर्व जण व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा (दळणवळण बंदीमुळे घरात राहून ‘ऑनलाईन’ सत्संग घेणे इत्यादी सेवा) करण्यास बसतो. त्या खोलीत इतर खोल्यांच्या तुलनेत पुष्कळ थंडावा जाणवतो. अन्य नातेवाइकांनीही मला ‘इथे वातानुकूल यंत्र लावले होते का ?’, असे बर्‍याच वेळा विचारले आहे. गेले अडीच मास हा थंडावा टिकून आहे. सद्गुरु स्वातीताई, तुम्ही हे ‘श्रीविष्णूचे शयनगृह आहे’, असा भाव ठेवण्यास आम्हाला सांगितले होते. तेव्हापासून आम्हाला या खोलीत ही अनुभूती येत आहे.

३. वरील सूत्रे लिहितांना ‘स्वतःविषयी लिहित नसून दुसर्‍या कुणाविषयी लिहित आहोत’, असा साक्षीभाव जाणवणे

ही सूत्रे लिहून देतांना ‘काय लिहून द्यावे ?’, हे मला कळत नव्हते. ‘भगवान श्रीकृष्ण आणि परम पूज्य, ‘तुम्हीच हे सर्व माझ्याकडून लिहून घेत आहात’, असे मला जाणवले. ‘लिखाण करतांना मी माझ्याविषयी लिहित नसून दुसर्‍या कुणाविषयी लिहित आहे’, असा साक्षीभाव मला जाणवत होता.

‘सद्गुरु स्वातीताई, साधारण एवढी सूत्रे माझ्या लक्षात आली. ‘माझ्याकडून लिखाणात काही चुकले असल्यास आणि ‘अजूनही मी साधनेत फार न्यून पडतो’, यासाठी तुमच्या चरणी अनंत कोटी वेळा क्षमायाचना करतो. सद्गुरु स्वातीताई, तुमच्या सत्संगामुळे गुरुमाऊली मला भरभरून देत आहे. माझ्या सर्व इच्छा ईश्वर पूर्ण करत आहे. ‘माझ्यावर कृपेचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवते. ‘देवाने मला सद्गुरूंचा सत्संग दिला’, यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद. (मे २०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक